

Mohammad Sharif shot dead : उत्तर प्रदेशातील २००८ मधील बहुचर्चित रामपूर केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF)च्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी मोहम्मद शरीफ याची आज (दि.१०) अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. रामपूर येथे झालेल्या या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शरीफला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी शरीफवर अंधाधुंद गोळीबार केला. त्यातील एक गोळी त्याच्या डोक्यात अगदी जवळून मारण्यात आली. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
अल्लाहाबाद उच्च न्यायालयाने शरीफवरील हत्या, दहशतवाद आणि कारस्थानाचे मुख्य आरोप रद्द करत सुटका करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वर्षभरापूर्वीच त्याची बरेली मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली होती. न्यायालयाने मुख्य आरोपांतून मुक्तता केली असली तरी शस्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवून त्याला १० वर्षांची कैद आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.दरम्यान, अल्लाहाबाद उच्च न्यायालयाने मुख्य आरोपांतून केलेली सुटका अयोग्य असल्याचे सांगत उत्तर प्रदेश सरकारने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
सुहेल, साजिद, अन्वर आणि अली अशा विविध नावांनी ओळखला जाणारा मोहम्मद शरीफ हा रामपूरचाच रहिवासी होता. ३१ डिसेंबर २००७ च्या मध्यरात्री आणि १ जानेवारी २००८ च्या पहाटे रामपूर येथील CRPF च्या ग्रुप सेंटरवर झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात त्याचा थेट सहभाग होता.लष्कर-ए-तय्यबा या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने घडवून आणलेल्या या हल्ल्यात ७ CRPF जवान आणि १ रिक्षाचालक शहीद झाले होते, तर ५ जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी शरीफसह अन्य आरोपींना अटक केली होती.
२०१९ मध्ये रामपूर सत्र न्यायालयाने शरीफसह सबाउद्दीन, इम्रान शहजाद आणि मोहम्मद फारुख या चौघांना फाशीची शिक्षा सुनावली होती, तर जंग बहादूर खान या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.या प्रकरणाला २९ ऑक्टोबर २०२५ रोजी अल्लाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठे वळण मिळाले. तपासात गंभीर त्रुटी राहिल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने शरीफ आणि इतर आरोपींवरील हत्या, दहशतवाद आणि गुन्हेगारी कारस्थानाचे आरोप फेटाळून लावले.मात्र, शस्त्र कायद्याच्या कलम २५(१-ए) अंतर्गत त्यांना दोषी धरत १० वर्षांची शिक्षा व १ लाख रुपयांचा दंड कायम ठेवला होता. सुमारे १७ वर्षे, ८ महिने आणि १० दिवस तुरुंगात घालवल्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये शरीफची बरेली मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली होती.