

Mobile phone blast:
मुझफ्फरनगर : शर्टच्या खिशातील मोबाईल फोनचा स्फोट झाल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्यावर पडलेल्या ४० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विकास असे या मृत तरुणाचे नाव असून, सोमवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. शर्टच्या खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विकास हा रहमतपूर गावचा रहिवासी होता. सोमवारी तो आई कमलेश हिला शाहपूरजवळील नरोत्तमपूर माजरा येथे तिच्या माहेरी, म्हणजेच विकासच्या मामाच्या घरी सोडण्यासाठी गेला होता. तेथून संध्याकाळी दुचाकीवरून घरी परतत असताना मुझफ्फरनगरमधील बेहलाना चौकाजवळ ही घटना घडली. त्याच्या शर्टच्या खिशातील मोबाईलचा अचानक मोठा आवाज होऊन स्फोट झाला. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि विकास रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने विकासला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांनीही रुग्णालयात धाव घेतली. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. विकासचा मृतदेह घरी आणल्यानंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
विकास हा खैखेरी येथील उत्तम शुगर मिलमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. त्याच्या अचानक मृत्यूमुळे रहमतपूर गावावर शोककळा पसरली आहे. जिल्हा पंचायत प्रशासक डॉ. वीरपाल निरवाल आणि बिजनौर मतदारसंघातील राष्ट्रीय लोक दलाचे खासदार चंदन चौहान यांच्या पत्नी यशिका चौहान यांनी विकासच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
मोबाईल फोन हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला असताना, त्याच्या स्फोटामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. विकासच्या घरी सांत्वनासाठी जमलेल्या नागरिकांमध्येही या घटनेची चर्चा सुरू होती. मोबाईलच्या बॅटरीचा अति उष्णता किंवा इतर कारणांमुळे स्फोट होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मात्र, या प्रकरणात स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे घटनेचे कारण निश्चित होण्यासाठी अधिकृत तपासातील निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार आहेत.