

MLA cash video: राज्यातील राजकारण सध्या एका 'कॅश बॉम्ब'ने ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक खळबळजनक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्येपैशांनी भरलेली बॅग आणि नोटांचे बंडल मोजताना काही व्यक्ती दिसत आहेत. दानवे यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट सवाल केला. 'हा व्हिडिओ बनावट असून, तुम्ही पूर्ण पुरावे द्या. जर मी खोटा ठरलो तर माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन,' असे आव्हान या आमदार महेंद्र दळवी यांनी दानवे यांना दिले आहे.
पत्रकार परिषदेत महेंद्र दळवी म्हणाले की, राजकारणासाठी अशी बदनामी करण्याचा अंबादास दानवे यांचा स्वभाव आहे. त्यांना तो विवादास्पद व्हिडिओ कोणी दिला त्या व्यक्तीला अंबादास दानवे यांनी समोर आणावे. दानवे यांना पक्षात कोणी विचारत नसल्याने ते असे कृत्य करत आहेत. व्हिडिओमध्ये पैशांच्या गड्डीसमोर बसलेली लाल टी-शर्ट घातलेली व्यक्ती कोण आहे? अंबादास दानवे यांनी त्याचा क्लिअर फोटो आणि संभाषण (ऑडिओ) दाखवावे. मी त्यांनी कधीही लाल टी-शर्ट घातलेला नाही आणि हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे, असा दावाही त्यांनी केला. विधानसभा अधिवेशनाच्या काळात सरकारची आणि आमची बदनामी करण्यासाठी असे प्रकार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ कोणत्या 'बोलवत्या धनी'च्या सांगण्यावरून पोस्ट केला आणि त्यांना कोणी सुपारी दिली, हे त्यांनी जाहीर करावे. दानेव यांचा बोलवता धनी कोण आहे, हे महाराष्ट्र नक्कीच शोधेल. शेतकरी कर्जमाफीवर प्रश्न विचारणाऱ्या दानवेंकडे आता कोणतेही काम उरलेले नाही त्यामुळे निराशेपोटी असे कृत्य करत आहेत, असा आरोपही दळवी यांनी केला.
तो व्हिडिओ कसा तयार केला गेला आणि हे सगळं कटकारस्थान कसं रचलं, याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. मी जर खरंच त्या फोटोमध्ये असेल, तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन. सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मी या संदर्भात नक्कीच विधानमंडळात भाष्य करणार आहे. तसेच कायदेशीर कारवाईही करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.