

ambadas danve MLA cash video: राज्यातील राजकारण सध्या एका 'कॅश बॉम्ब'ने ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक खळबळजनक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात पैशांनी भरलेली बॅग आणि नोटांचे बंडल मोजताना काही व्यक्ती दिसत आहेत. दानवे यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट सवाल केला आहे.
राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यावेळी शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक यांनी राज्यात ऑपरेशन टायगर सुरू असल्याचे वक्तव्य केलं होतं. त्यातच आता अंबादास दानवे यांनी पाठोपाठ तीन व्हिडिओ एक्सवर पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे.
अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दानवे यांनी ट्विटरवर (X) हा व्हिडिओ पोस्ट करताना खालील प्रश्न उपस्थित केले. "या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे." असं म्हणत अंबादास दाणवे यांनी टीका केली. तसंच त्यांनी, जनतेला जरा सांगा, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदेजी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? असा सवाल देखील केला.
दानवे यांनी अशा पद्धतीने एकामागून एक तीन व्हिडिओ पोस्ट केले आहेत, ज्यात एका बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचे बंडल ठेवलेले दिसत आहेत, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नोटा मोजताना दिसत आहे.
या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर कठोर टीका केली. त्यांनी "कॅश दिसल्यावर ते लगेच सांगणार हे माझ्या बिझनेसचे पैसे होते. आपण डिजिटल व्यवहाराकडे चाललो असताना इथे कॅशने व्यवहार होत आहेत. इतकी कॅश लागते का?" असा सवाल केला.
त्याचबरोबर पेडणेकर यांनी "हे इलेक्शन नाही हे सिलेक्शन आहे. हे लोकशाहीने होत नाहीये. हे इलेक्शन जिंकतात, ते लायकीवर नाही, फक्त पैशावर जिंकतात." असा घणाघात देखील केला.
पेडणेकरांनी "इतका पैसा, इतका पैसा जनतेचा लुटलेला आहे तो असा बाहेर फुटायला लागला आहे. मुंबई बघा ना, हजार कोटीची लूट करून कितीवर आणून ठेवली." अशी टीका केली.
महेंद्र दळवी यांच्यावर लक्ष
माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी दिसत असल्याची चर्चा जोर धरू लागल्याने, सत्ताधारी पक्षाकडून यावर काय स्पष्टीकरण येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऑपरेशन टायगरची चर्चा
दरम्यान, याच व्हिडिओ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सरनाईक यांनी "राज्यात ऑपरेशन टायगर सुरू आहे," असे सूचक विधान केले होते. दानवे यांच्या कॅश बॉम्बने आता 'ऑपरेशन टायगर' या विधानाला नवा आयाम दिला असून, राजकीय खळबळ आणखी वाढण्याची शक्यता आहे.