Microsoft Services Down | ‘मायक्रोसॉफ्ट’ ठप्पचा अख्ख्या जगाला फटका

Microsoft Services Down |
Microsoft Services Down | ‘मायक्रोसॉफ्ट’ ठप्पचा अख्ख्या जगाला फटका
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड आणि ऑफिस सेवांमध्ये गुरुवारी (दि. १२) मध्यरात्रीनंतर मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने भारतासह जगभरातील ७४ देशांमधील लाखो वापरकर्ते, कंपन्या आणि सरकारी कामकाज विस्कळीत झाले आहे. जगभरातील कंपन्या, स्टॉक एक्‍स्‍चेंज, विमानसेवा आणि शिपिंग कंपन्यांच्या कामात अडथळे निर्माण झाले.

युरोपमधील ‘युरोनेक्स्ट’ स्टॉक एक्‍स्‍चेंजच्या लिस्टिंग टीमचा ई-मेल संपर्क तुटला, तर ब्रिटनमधील ‘अविवा’ या विमा कंपनीला आपल्या बैठकांसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागली. डॅनिश शिपिंग कंपनी ‘मर्स्क’नेही ग्राहकांना ई-मेल आणि अपडेटस्‌ उशिरा मिळतील, असा इशारा दिला. अमेरिकेतील ‘ओपनएआय’ आणि ‘अँथ्रॉपिक’ या एआय कंपन्यांनाही मायक्रोसॉफ्ट कनेक्टर्समध्ये अडचणींचा सामना करावा लागला.

सरकारी कामकाज, एक्‍स्‍चेंज ऑनलाईनवर परिणाम

ऑस्ट्रेलियाचे सायबर सुरक्षामंत्री टोनी बर्क यांनी सांगितले की, हा सायबर हल्ला नसून प्रामुख्याने ई-मेल प्रणालीवर याचा परिणाम झाला आहे. ऑस्ट्रेलियाची गुप्तचर संस्था आणि फेडरल पोलिसांनाही याचा फटका बसला. अमेरिकेचे ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्‍हज’ आणि जपान सरकारच्या माहिती-तंत्रज्ञान पायाभूत सुविधांमध्येही अडथळे निर्माण झाले. मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊडआधारित ‘एक्‍स्‍चेंज ऑनलाईन’ प्लॅटफॉर्मवर अवलंबून असलेल्या ई-मेल, कॅलेंडर आणि कॉन्टॅक्‍टस्‌ या सेवा पूर्णपणे प्रभावित झाल्या होत्या.

नेमके काय घडले?

तांत्रिक त्रुटी : मायक्रोसॉफ्टच्या स्वयंचलित ‘सर्व्हर हेल्थ चेक’ प्रणालीमध्ये बिघाड झाल्यामुळे अनेक सर्व्हर अचानक बंद पडले. परिणामी, उर्वरित सर्व्हर्सवर प्रचंड भार येऊन संपर्क यंत्रणा कोलमडली.

सायबर हल्ला नाही : हा कोणताही सायबर हल्ला किंवा घातपाती कृत्य नसून, अंतर्गत पायाभूत सुविधांमधील तांत्रिक बिघाड असल्याचे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे.

तक्रारींचा महापूर : ‘डाऊनडिटेक्टर’ या संकेतस्थळावर केवळ आऊटलूकबाबत १ लाख ३८ हजारांहून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या, ज्या नेहमीपेक्षा दोन हजार पटींनी जास्त होत्या.

सद्यस्थिती काय आहे?

मायक्रोसॉफ्टच्या अभियंत्यांनी नवीन सॉफ्टवेअर अपडेटस्‌ तात्पुरते थांबवून ट्रॅफिक पर्यायी मार्गांवर वळवले आहे. आशिया-पॅसिफिक, युरोप आणि उत्तर अमेरिकेत सर्व्हर हळूहळू पूर्ववत होत असून, ई-मेल सेवा सुधारत आहेत. मात्र, काही भागांत अद्यापही अधूनमधून तांत्रिक अडचणी येत असून, सर्व सेवा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी मायक्रोसॉफ्टकडून प्रयत्न सुरू आहेत.

व्यवहारांसाठी चक्क ‘फॅक्स’चा वापर

तैवानमधील गुंतवणूक संस्था, विमा कंपन्या आणि सिक्युरिटीज फर्म्सच्या कामकाजावर याचा गंभीर परिणाम झाला. ई-मेल सेवा बंद पडल्याने एका कंपनीला चक्क बाँड पुनर्खरेदीचा व्यवहार रद्द करावा लागला, तर दुसऱ्या एका वित्तीय कंपनीने व्यापाराची खात्री करण्यासाठी जुन्या काळातील फॅक्स मशिनचा वापर केला. अमेरिकेतील ‘वर्कहॉर्स ग्रुप’ आणि स्वित्झर्लंडच्या ‘रिचमॉन्ट’ या कंपन्यांना आर्थिक निकाल जाहीर करण्यास विलंब लागला.

मायक्रोसॉफ्टच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

‘मायक्रोसॉफ्ट ३६५’ सेवेत यंदाच्या वर्षातील हा दुसरा मोठा बिघाड आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये आणि गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्येही अशाच समस्या उद्‌भवल्या होत्या. ‘ईटोरो’चे बाजार विश्लेषक जोश गिल्बर्ट यांच्या मते, ग्राहक रातोरात मायक्रोसॉफ्टची प्रणाली सोडू शकत नसले, तरी वारंवार होणारे हे बिघाड कंपन्यांच्या आयटी विभागांना एकाच सेवा पुरवठादारावर अवलंबून राहण्याबाबत पुनर्विचार करण्यास भाग पाडतील.

१. प्रभावित झालेल्या सेवा : मायक्रोसॉफ्ट आऊटलूक आणि एक्‍स्‍चेंज ऑनलाईन यांना सर्वाधिक फटका बसला.भयाशिवाय, मायक्रोसॉफ्ट ३६५, शेअरपॉईंट, वन ड्राईव्ह, टू डू आणि एआय सहायक कोपायलटच्या सेवा विस्कळीत झाल्या. टीम्सचेे मेसेजिंग सुरू असले तरी कॅलेंडर आणि मिटिंग शेड्यूल करण्यात अडथळे आले.

२. अन्य एआय कंपन्या : मायक्रोसॉफ्टच्या पायाभूत सुविधांशी जोडलेल्या ओपनएआय आणि अँथ्रोपिक या कंपन्यांच्या ‘मायक्रोसॉफ्ट ३६५ कनेक्टर’ सेवांवरही परिणाम झाला.

३. भारताच्या समस्या : आयटी कंपन्या, कॉर्पोरेट कार्यालये आणि स्टार्टअप्सच्या सकाळच्या सत्रातील ई- मेल व कार्यालयीन कामकाजाचा मोठा खोळंबा झाला.

मायक्रोसॉफ्टच्या ‘आऊटलूक’, ‘टीम्स’ आणि ‘कोपायलट’ सेवा सलग १२ तासांहून अधिक काळ विस्कळीत राहिल्याने जगभरातील कामकाजावर मोठा परिणाम झाला.

सर्व्हरच्या समस्येमुळे ही सेवा ठप्प झाली असून, कोणताही सायबर हल्ला नसल्याचे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे.

मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना ई-मेल संवादाअभावी मोठा फटका बसला; काहींना चक्क फॅक्स मशिनचा आधार घ्यावा लागला.

‘मायक्रोसॉफ्ट ३६५’ वर्षातील हा दुसरा मोठा तांत्रिक बिघाड असल्याने कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.