पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील विविध राज्यांत पावसाने दमदार बॅटिंग सुरु आहे. हवाभाग विभागाने ९ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील १० जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून, पुरामुळे ४० हजारांहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. गुजरातलाही गेल्या दोन दिवसांपासून पावसाने झोडपून काढले आहे. मध्य प्रदेशातील पावसामुळे अनेक नद्या, बंधारे आणि तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
मागील दोन दिवसांपासून पावसाने गुजरातमधील विविध भागांना झोडपून काढले आहे. द्वारका येथील खंभलिया येथे तीन मजली इमारत कोसळून वृद्धेसह तिच्या दोन नातवंडांचा मृत्यू झाला. मंगळवारी (२३ जुलै) रात्री घडलेल्या दुर्घटनेनंतर एनडीआरएफने ६ तास चाललेल्या बचाव मोहिमेत ५ जणांना वाचवले.
सुरतमध्ये मागील २४ तासांमध्ये तब्बल २२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरुप आले. कच्छ जिल्ह्यातील नख्तरणा तालुक्यात पुरामुळे लोकांची घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
मध्य प्रदेश राज्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक नद्या, बंधारे आणि तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. २४ तासांत इंदिरा सागर, तिघरा, तवा, बर्गी या मोठ्या धरणांतील पाणीसाठा ३ ते ६ फुटांनी वाढला आहे. बैतुलचे सातपुडा, मांडला येथील नैनपूरचे थावर आणि श्योपूरचे धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षण उघडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने महाराष्ट्रासह ९ राज्यांमध्ये आज (दि.२४) मुसळधार पावासाचा इशारा दिला आहे. यामध्ये गुजरात, गोवा, ओडिशा, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कर्नाटक, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर, गोरखपूर, महाराजगंज, गोंडा, बहराइचसह 10 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. गोरखपूरमध्ये राप्ती नदीला उधाण आले आहे. नदीकाठावर वसलेली गावे पुराच्या पाण्याने तुडुंब भरली आहेत. सुमारे 40 हजार लोक बाधित झाले आहेत.