मुंबई : मुंबई शहर उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे सतत पडणाऱ्या मुंबईचे जनजीवन 'स्लो ट्रॅक'वर आले आहे. सोमवारी सकाळी शहरासह उपनगरात पावसाचा जोर असल्यामुळे सकाळी ६ ते ७ या एक तासात अनेक ठिकाणी ३५ ते ४० मिमी पाऊस झाला. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. मध्य व पश्चिम रेल्वेची लोकल सेवाही विस्कळीत झाल्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे चांगलीच रखडपट्टी झाली.
मुंबईत गेल्या तीन-चार दिवसापासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रविवार सकाळी ८ ते सोमवार सकाळी ८ वाजेपर्यंत शहरात १३५ मिमी, पूर्व उपनगरात १५४ मिमी तर पश्चिम उपनगरात १३७ मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी सकाळपासून पुन्हा पावसाने जोर पकडला असून सकाळी ६ ते ७ या एक तासात मलबार हिल ३४ मिमी, मुलुंड ३४ मिमी, भांडुप २९ मिमी, वडाळा २४ मिमी, वेसावे २० मिमी, वरळी १९ मिमी, तर अन्य ठिकाणीही २० ते २५ मिमी पाऊस झाला. त्यामुळे या भागात पाणी तुंबले असून पाण्याचा निचरा करण्यात येत आहे. आज दुपारी १२.५० वाजता अरबी समुद्राला मोठी भरती असून यावेळी समुद्रात ४.५९ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे समुद्रालगत नाल्यांचे सर्व दरवाजे बंद करण्यात येणार आहेत. या काळात मुंबईत जोरदार पाऊस झाल्यास संपूर्ण शहरात पाणीच पाणी होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.