

Menstrual Leave
नवी दिल्ली: भारतात महिलांना मासिक पाळीच्या काळात सुटी देण्याबाबत दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अशी सुट्टी अनिवार्य केल्यास महिलांच्या रोजगारावर आणि त्यांच्या सक्षमतेच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा 'पीरियड्स लीव'चा मुद्दा चर्चेत आला आहे. भारतात जरी हा विषय अद्याप चर्चेत असला, तरी जगातील अनेक प्रगत आणि विकसनशील देशांनी यावर ठोस कायदे केले आहेत.
जगभरातील कोणत्या देशांमध्ये महिलांना ही सुटी मिळते आणि तिथले नियम काय आहेत, जाणून घ्या.
इंडोनेशियामध्ये हा नियम अत्यंत जुना आहे. १९४८ पासूनच येथे महिलांना मासिक पाळीच्या काळात दरमहा २ दिवसांची पगारी सुटी घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या जपानमध्ये १९४७ पासूनच 'सेइरी क्युका' (मासिक पाळीची सुटी) ही तरतूद लागू आहे. मात्र, ही सुटी पगारी असावी की विनापगारी, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तेथील कंपन्यांना देण्यात आले आहे.
तैवानमधील 'जेंडर इक्वालिटी इन एम्प्लॉयमेंट' कायद्यानुसार, महिलांना वर्षाला ३ दिवसांची मासिक पाळीची सुटी घेता येते. विशेष म्हणजे, या सुटीच्या कालावधीत महिलांना अर्धे वेतन दिले जाते.
दक्षिण कोरियामध्ये २००१ पासून हा कायदा लागू आहे. महिलांना मासिक पाळीदरम्यान महिन्याला एक दिवसाची सुट्टी मिळते. विशेष म्हणजे एखाद्या महिलेनं ही सुट्टी घेतली नाही, तर कंपनीकडून तिला त्याबदल्यात अतिरिक्त पैसे दिले जातात.
आफ्रिकेतील झांबिया या देशात पीरियड्स लीव्हला ‘मदर्स डे’ असे म्हटले जाते. २०१५ मध्ये हा कायदा लागू करण्यात आला. या नियमानुसार महिलांना कोणतीही पूर्वसूचना न देता महिन्याला एक दिवसाची सुट्टी घेण्याची मुभा आहे.
व्हिएतनाममध्ये महिलांना कामाच्या ठिकाणी लवचिकता दिली जाते. मासिक पाळीच्या काळात महिला दररोज ३० मिनिटांचा ब्रेक घेऊ शकतात किंवा महिन्यातून ३ दिवस सुटी घेऊ शकतात.
स्पेनने २०२३ मध्ये या संदर्भात कायदा केला. तीव्र वेदना किंवा त्रास असल्यास महिलांना तीन ते पाच दिवसांची रजा घेता येते. विशेष बाब म्हणजे या रजेचा खर्च सरकार उचलते.