Crime News
मेरठ : पतीची हत्या करून त्याचा मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी मेरठ न्यायालयाने २८ वर्षीय महिला आणि तिच्या २० वर्षीय प्रियकराला दोषी ठरवले आहे. पतीच्या मृतदेहाखाली जिवंत विषारी साप ठेवून संपूर्ण घटनेला सर्पदंशाचे स्वरूप देण्याचा धक्कादायक कट रचण्यात आला होता. न्यायालय १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत शिक्षेचे स्वरूप जाहीर करेल.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयवीर सिंह नगर यांनी मेरठच्या अकबरपूर सदात येथील रहिवासी रविता कश्यप आणि अमरदीप यांना अमित कश्यप (३१) यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले. अमित यांचा १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी घरातील पलंगावर मृतदेह आढळून आला होता.
पोलिसांच्या तपासानुसार, अमित यांच्या मृतदेहाखाली एक जिवंत विषारी साप आढळला होता. तसेच त्यांच्या शरीरावर सर्पदंशाच्या सुमारे १० खुणा दिसून आल्या होत्या. त्यावेळी रविता हिने पतीला सापाने दंश केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालातून अमित यांचा मृत्यू सर्पदंशामुळे नव्हे, तर श्वास गुदमरल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदन अहवाल आणि डॉ. कपिल गर्ग यांच्या साक्षीनूसार, अमितचे तोंड आणि नाक दाबले गेले होते आणि त्याचा गळा आवळला गेला होता. या दाबामुळे त्याच्या हायॉइड हाडाला आणि थायरॉईड कार्टिलेजला फ्रॅक्चर झाले होते.
शवविच्छेदन अहवालाच्या आधारे अमित याचा भाऊ मोनू याने भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत हत्या आणि कलम ६१(२)(अ) अंतर्गत गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी २६ जून २०२५ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरने एका गारुड्याकडून १,००० रुपयांना साप विकत घेतला होता; धार्मिक कार्यक्रमासाठी त्याची गरज असल्याचे त्याने सांगितले होते. नंतर त्या गारुड्याने सरकारी पक्षाचा साक्षीदार म्हणून साक्ष दिली. या खटल्यात सरकारी पक्षाने १२ साक्षीदारांची साक्ष नोंदवली.