

Meerut Extramarital affair Husband Wife Viral Video
मेरठ : विवाहबाह्य संबंधांची कारणं काहीही असली तरी यात एक गोष्ट कायम असते ती म्हणजे प्रेमाच्या या त्रिकोणात एकाला कोणाला तरी मनस्तापाचा सामना करावा लागतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मेरठमधील शहजाद याला त्याच्या पत्नीने प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले आणि दोघांना एकत्र बघितल्यावर पारा चढलेल्या पत्नीने दोघांचीही धुलाई केली. पती आणि त्याच्या प्रेयसीला मारहाण करतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मेरठमधील नौचंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मारहाणीची घटना घडली आहे. रामबाग कॉलनीत शहजाद आणि एक तरुणी भाड्याच्या खोलीत राहत होते. बुधवारी दुपारी शहजादची पत्नी शायमा आणि तिचे नातेवाईक रामबागमधील शहजादच्या घरी पोहोचले. घरात शहजादची प्रेयसीही असल्याचे समजल्यावर शायमाचा पारा चढला आणि तिने घराबाहेरच ठाण मांडले. संतापलेली शायमा काही वेळाने घरात घुसली आणि शहजादच्या प्रेयसीची धुलाई केली. शहजादने पत्नीला थांबवण्याचा प्रयत्नही केला पण शायमा इतकी संतापली होती की परिस्थिती चिघळत केली.
व्हायरल व्हिडिओत काय दिसते?
व्हायरल व्हिडिओमध्ये शायमा आधी घराबाहेर थांबल्याचे दिसते. माझ्या दोन्ही मुलींना इथे बोलवून घ्या, त्यांनाही वडिलांचं हे रुप दिसू दे. मी त्याच्यासाठी (शहजाद) राबले आणि त्याने असं केलं, शायमा रडत रडत बोलत आहे. शहजाद तिची समजूत काढून हे प्रकरण अशा पद्धतीने सोडवण्याऐवजी शांतपणे बोलूनही सोडवता येईल अशी विनंती करतोय. व्हिडिओ काढणाऱ्या शायमाच्या नातेवाईकांनाही तो व्हिडिओ शूट करू नका असं सांगतोय. हा वाद तुम्ही असं सोडवणार का, असा सवालही तो शायमाच्या नातेवाईकांना विचारतोय. शहजाद हा पत्नीला सोडून दुसऱ्या धर्मातील मुलीसोबत राहतोय, असा आरोपही शायमाचे नातेवाईक करतायंत.
पोलिस तपास सुरू
शायमाच्या नातेवाईकांनी या घटनेची माहिती नौचंदी पोलिस ठाण्याला दिली. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि शहजाद, त्याची प्रेयसी आणि पत्नी शायमा या तिघांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून शहजादने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याला यापुढे ना प्रेयसीसोबत रहायचे ना पत्नीसोबत. तर दुसरीकडे शायमाने पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.