Tripura BSF Solider Viral Video
नवी दिल्ली : भारत- पाकिस्तान सीमारेषेवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी घुसखोरी करणाऱ्या दहशतवादी आणि पाक सैन्याला अद्दल घडवली असतानाच दुसरीकडे भारत- बांगलादेश सीमेवरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीमा रेषेवर भारतीय हद्दीतील संवेदनशील भागाचे व्हिडिओ शूट करणाऱ्या दोन तरुणांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने आधी नम्रपणे विनंती केली. कृपया व्हिडिओ शूट करू नका, असं सांगूनही दोन तरुण व्हिडिओ शूट करत होते. शेवटी जवानाने बंदूक बाहेर काढताच त्या तरुणांना परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात आले आणि दोघांनी तिथून अक्षरश: पळ काढला.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ हा त्रिपुरातील असल्याचा दावा केला जात आहे.
व्हिडिओत नेमके काय आहे?
दोन तरुण (व्हिडिओत दिसणारा आणि व्हिडिओ शूट करणारा असे दोन जण) भारतीय हद्दीतील भागाचे व्हिडिओ शूट करत आहेत. सीमारेषेवरील बीएसएफचा जवान त्या तरुणांना थांबवतो. कृपया व्हिडिओ शूट करू नका अशी विनंती त्या जवानाने तरुणांना केली. पण जवानाच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून व्हिडिओ शूटिंग सुरूच होते. शेवटी जवान त्या दोघांना मला गोळी झाडावी लागेल, अशी तंबीच देतो. या तंबीलाही तरुण गांभीर्याने घेत नाहीये हे बघून तो जवान बंदुक लोड करतो आणि तेव्हा मात्र दोघेही तरुण तिथून पळ काढतात.
सोशल मीडियावर काय दावा केला जातोय?
सोशल मीडियावरील दाव्यानुसार हा व्हिडिओ भारत - बांगलादेश सीमेवरचा आहे. त्रिपुरा राज्यातील सीमेवरचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शूट करणारे दोघं तरुण हे इन्फ्लुएन्सर असल्याचंही सांगितलं जातंय. मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, कोणत्या भागात ही घटना घडली हे मात्र स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे बीएसएफनेही या वृत्तावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
व्हिडिओ त्रिपुराचा आहे का?
व्हायरल व्हिडिओ हा Net E News या युट्यूब चॅनलवरील आहे. ईशान्य भारतातील ही वृत्तवाहिनी असल्याचं युट्यूबवरील Description मध्ये म्हटले आहे. त्रिपुराच्या सीमेलगत बांगलादेश आहे. या भागातून भारतात घुसखोरीचा प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे व्हिडिओ हा त्रिपुराचाच असला तरी नेमका कधीचा आहे हे स्पष्ट झालेले नाही.
सोशल मीडियावर होतंय कौतुक
बीएसएफच्या जवानाच्या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होतंय. जवानाने धाडस दाखवलं, घुसखोरांना असंच रोखलं पाहिजे, भारत सीमेवरील संवेदनशील परिसराचं शूट करणाऱ्या जवानाने चांगली अद्दल घडवली अशा प्रतिक्रिया युजर्स देत आहेत.