Viral Video black bear cub rescue
सान डिएगो : अमेरिकेतील प्राण्यांच्या आरोग्याची देखभाल करणाऱ्या 'सान डिएगो ह्युमन सोसायटी' या संस्थेतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लॉस पाड्रेस राष्ट्रीय जंगलात सापडलेल्या दोन महिन्यांच्या अस्वलाच्या पिल्लाला (शावक) या संस्थेने वन्यजीव केंद्रात आणले आहे. विशेष म्हणजे, या पिल्लाची देखभाल करणारी महिला कर्मचारी थेट अस्वलाच्या वेषात त्याच्यासोबत असते.
लॉस पाड्रेस नॅशनल फॉरेस्टमध्ये ट्रेकिंग करणाऱ्या दोन पर्यटकांना जंगलात केवळ दोन महिन्यांचे अस्वलाचे शावक एकटेच सापडले. हे पिल्लू इतकं लहान होतं की ते स्वतःहून जगू शकणार नव्हतं. त्यामुळे त्या दोघांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सुरुवातीला त्या पिल्लाला त्याच्या आईजवळ घालवण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठेच आई अस्वल सापडले नसल्याने एप्रिल महिन्यात त्या पिल्लाला रमोना वन्यजीव केंद्रात दाखल करण्यात आले.
या संस्थेत काम करणाऱ्या ऑटम वेल्च या महिला कर्मचारी कामावर जाताना फरचा कोट, लेदरचे ग्लोव्हज आणि अस्वलाचा मुखवटा घालतात. जेव्हा त्या अस्वलाच्या वेषात पिंजऱ्यात जातात, तेव्हा ते पिल्लू त्यांच्यासोबत खेळते. अस्वलाच्या पिल्लाला त्याची आई वाटावी म्हणून वन्यजीव केंद्रातील एका कोपऱ्यात मोठा टेडी अस्वल ठेवले आहे. पिल्लू घाबरले की ते त्याच्याकडे धावत जाते आणि टेडीला बिलगते.
'सान डिएगो ह्युमन सोसायटी' च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अस्वालाच्या पिल्लाची माणसांशी जवळीक होऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांना अस्वलाच्या वेशभूषेत त्याची देखभाल करावी लागत आहे. कारण, जर माणसांशी सवय झाली, तर त्याला पुन्हा जंगलात सोडणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच त्याला नैसर्गिक आणि वन्य वातावरणाची सवय करून दिली जात आहे.