

नवी दिल्ली : शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन, नेक्स्ट जनरेशन डिस्ट्रॉयर (एनजीडी) प्रकल्पासह प्रस्तावित नवीन युद्धनौका आणि पाणबुडी बांधणीची कामे प्राधान्याने माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) या सरकारी कंपनीला देण्याची आग्रही मागणी केली आहे.
खासदार म्हस्के यांनी संरक्षण मंत्रालयाकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले की, एनजीडी प्रकल्पासाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविण्याचा विचार सुरू असला, तरी या क्षेत्रातील अनुभव, कौशल्य आणि तांत्रिक क्षमतेच्या दृष्टीने माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही सर्वाधिक पात्र कंपनी आहे. युद्धनौकांच्या बांधकामासाठी भारतीय शिपयार्डला नामांकन देण्याची तरतूद संरक्षण अधिग्रहण प्रक्रियेत आहे आणि एनजीडीसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी ही तरतूद अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडे युद्धनौका बांधणीतील अद्वितीय तांत्रिक आणि धोरणात्मक अनुभव, गोपनीय तंत्रज्ञान हाताळण्याची क्षमता आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधा आहेत. त्यामुळे भारतातील विध्वंसक युद्धनौका बांधण्याची क्षमता असलेले हे एकमेव शिपयार्ड असल्याचे म्हस्के यांनी निदर्शनास आणून दिले.