

Naresh Mhaske on Pandharpur Wari Urban Naxals
ठाणे : पंढरपूर वारीमधील `अर्बन नक्षल्यां'च्या घुसखोरीवरून महाराष्ट्र विधिमंडळात चर्चा करण्यात येत आहे. या गंभीर विषयावर स्वतःला ‘पुरोगामी’ समजणाऱ्या राजकारण्यांनी कोल्हेकुई सुरू केली असल्याची टीका शिवसेना प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. विरोधी पक्षाला आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही दिला आहे.
२०१३ साली केंद्रातील युपीए सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शहरी भागात माओवादी (नक्षलवादी ) विचारांचे लोक विविध संघटना - संस्थांच्या माध्यमातून सक्रिय आहेत, असे म्हटले होते. तसेच शहरी भागातील माओवादाचा प्रभाव वाढवण्यासाठी काम करणारे ‘अर्बन नक्षलवादी’ सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न आहे, अशी कबुली सर्वोच्च न्यायालयात तत्कालीन गृहमंत्री काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या अखत्यारीत काम करणाऱ्या गृहखात्याने दिली होती. याचा ‘पुरोगामी’ नेत्यांना विसर पडला का? असा सवाल खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.
कबीर कला मंचाच्या संपर्कात येऊन एक गरीब मुलगा नक्षलवादी झाला. पुढे त्याने आत्मसमर्पण केल्यावर काही धक्कादायक खुलासे केले. जंगलात नक्षलवाद्यांना ट्रेनिंग देण्यासाठी कबीर कला मंचाचे कार्यकर्ते येत होते, असे त्याने सांगितले. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वातील पोलीस दलाने कबीर कला मंचाशी संबंधित शीतल साठे आणि सचिन माळी यांना अटक केली. आज कोल्हेकुई करणाऱ्यांचा आर आर आबा यांच्यासारख्या निर्मळ माणसावरही विश्वास नाही का ? तेव्हा तुमचाच पक्ष सत्तेवर होता ना ? असाही सवाल खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.
गोरगरीबांच्या मुला-मुलींना फसवून देशविरोधी शक्तींसाठी बंदूकधारी केडर मिळवून देण्याचे षड्यंत्र असून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर कृपया पक्षीय राजकारण करू नका, असा सल्लाही खासदार नरेश म्हस्के यांनी दिला आहे.