

Mann Ki Baat
नवी दिल्ली : पंतप्रधानांनी आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमात गडचिरोलीसह पुणे आणि जालना जिल्ह्याचाही उल्लेख केला. पुण्यात मधमाश्या वाचवण्यासाठी अमित नावाच्या युवकाने स्थापन केलेल्या 'बी फ्रेंड्स' या टीमच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
पुण्यातील एका सोसायटीत मधमाशांचे पोळ तिथल्या रहिवाशांनी भीतीने किंवा सुरक्षेसाठी काढून टाकले. मात्र या घटनेने अमित नावाच्या व्यक्तीला खूप विचारात पाडले. अमितने ठरवले की मधमाशांना हाकलण्यापेक्षा त्यांना वाचवले पाहिजे. तो स्वतः हे तंत्र शिकला, मधमाशांवर संशोधन केले आणि यासाठी इतरांनाही जोडायला सुरुवात केली आणि त्यासाठी एक समूह तयार केला. त्याला 'बी फ्रेंड्स' असे नाव दिले.
आता हे मधमाशांचे मित्र मधमाशांची पोळी एका ठिकाणाहून दुसरीकडे सुरक्षितपणे घेऊन जातात जेणेकरून लोकांनाही धोका नसेल आणि मधमाशाही सुरक्षित राहतील. अमितजींच्या या प्रयत्नांना फळही चांगले आले. मधमाशांच्या वसाहती वाचत आहेत. मधाचे उत्पादन वाढत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनजागृतीही वाढत आहे. आपण जेव्हा निसर्गाशी ताळमेळ राखून काम करतो तेव्हा सर्वांचाच फायदा होतो हेच यावरून शिकायला मिळते. तसेच मधमाशांची सुरक्षा केवळ पर्यावरणासाठी नाही तर आपल्या शेती आणि भावी पिढ्यांसाठीही महत्त्वाची आहे, याची जाणीव यातून होते, असेही पंतप्रधान म्हणाले.
कागदापासून तयार होणारा कचरा आणि त्यातून कागदाची पुनर्निर्मिती याबाबत बोलताना पंतप्रधानांनी जालन्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, आपल्या घरात आणि कार्यालयात दररोज कागदाचा खूप कचरा तयार होतो. देशाचा भूभाग व्यापणाऱ्या कचऱ्यात जवळपास एक चतुर्थांश भाग कागदी कचऱ्याचा असतो. प्रत्येकाने या दिशेने विचार करण्याची आज गरज आहे. भारतातले अनेक स्टार्टअप उद्योग या क्षेत्रात छान काम करत आहेत, हे समजल्यावर मला आनंद झाला.
विशाखापट्टण गुरुग्राम अशा अनेक शहरांमध्ये अनेक स्टार्ट अप, कागदाच्या पुनश्चक्रीकरणाचे अभिनव मार्ग अवलंबत आहेत. महाराष्ट्रातील जालना सारख्या शहरात काही लोक १०० टक्के पुनर्निर्मित उत्पादनापासून पासून पॅकेजिंग रोल आणि पेपर कोअर (खर्डे) बनवत आहेत. एक टन कागदाच्या पुनर्निर्मितीने १७ झाडे तुटण्यापासून वाचतात आणि हजारो लिटर पाण्याची बचत होते, हे ऐकून तुम्हाला प्रेरणा मिळेल, असेही ते म्हणाले.