

TMC Internal Rift : अभिषेक बॅनर्जी हे अत्यंत उद्धट आणि गर्विष्ठ आहेत. ते ज्येष्ठ नेत्यांचा आदर करत नाहीत, त्यांचा माझ्यावर कधीच विश्वास नव्हता आणि त्यांच्यामुळेच पक्ष रसातळाला चालला आहे, असा गंभीर आरोप करत आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee) यांनी आमच्यात आणि अभिषेक बॅनर्जींमध्ये एकाची निवड करावी," असा थेट अल्टिमेटमच पक्षाचे ज्येष्ठ नेते कल्याण बॅनर्जी ( Kalyan Banerjee) यांनी दिला आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी आज पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यावर घणाघाती टीका केली. स्वाक्षरी फेरफार (Signature Forgery) प्रकरण आणि त्याशी संबंधित सीआयडी झडती प्रकरणातून ममता बॅनर्जींच्या पुतण्याने (अभिषेक बॅनर्जी) आपल्याला शेवटच्या क्षणी वकील पदावरून हटवल्याचा आरोप कल्याण बॅनर्जी यांनी केला आहे. हा आपला थेट 'अपमान' असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सध्याच्या राजकीय पडझडीच्या काळात अनेक खासदार आणि आमदारांनी ममता बॅनर्जींची साथ सोडलेली असतानाही, कल्याण बॅनर्जी मात्र ममतांसोबत ठामपणे उभे राहिले होते. मात्र, आता त्यांनी टीएमसी प्रमुखांना "आम्हाला निवडा किंवा अभिषेकला" असा थेट इशारा दिला आहे.
दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी या कथित स्वाक्षरी फेरफार प्रकरणात अभिषेक बॅनर्जी यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. अभिषेक सध्या दिल्लीत असून, न्यायालयाने त्यांना आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पश्चिम बंगाल सीआयडी समोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या सुनावणीपूर्वीच मध्यरात्री आपल्याला वकील पदावरून हटवण्यात आल्याचा दावा कल्याण बॅनर्जी यांनी केला. ममतांचे निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या कल्याण बॅनर्जींनी अभिषेक यांच्यावर निशाणा साधत म्हटले, "मी ममतादीदींसोबत आहे, पण आता त्यांना निवड करावीच लागेल. हे खूप अपमानास्पद आहे. मध्यरात्री मला सांगण्यात आले की वकील बदलला आहे. त्यांना ज्येष्ठांचा आदर कसा करावा हे माहित नाही. अभिषेकचा माझ्यावर कधीच विश्वास नव्हता आणि कधी असणारही नाही. तो स्वतःला काय समजतो? इतका गर्विष्ठ माणूस! त्याच्यामुळेच पक्ष उद्ध्वस्त झाला आहे."
कल्याण बॅनर्जी यांनी सांगितले की, जेव्हा कथित स्वाक्षरी फेरफार प्रकरणात सीआयडीने त्यांच्या आणि ममता बॅनर्जींच्या निवासस्थानी छापे टाकले, तेव्हा ते स्वतः तिथे हजर होते. तपास यंत्रणेने सोबत आणलेले दोन साक्षीदार भाजपशी संबंधित असल्याचा आक्षेपही त्यांनी घेतला होता. त्यांनी 'इंडिया टुडे'शी बोलताना सांगितले की, त्यांनी सीआयडीच्या या झडती कारवाईला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. मात्र, सुनावणीसाठी हजर राहण्यापूर्वीच त्यांना सांगण्यात आले की, आता या प्रकरणात त्यांच्याऐवजी दुसरे वकील किशोर दत्ता बाजू मांडणार आहेत.या अचानक घडलेल्या प्रकारामुळे संतापलेल्या कल्याण बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, ते आता यापुढे अभिषेक बॅनर्जींची बाजू मांडणार नाहीत. हे दोन्ही खटले एकमेकांशी जोडलेले असल्याने ते दोन्ही केसेस पाहत होते. "माझ्याशी अशी वागणूक का? मी काय कचऱ्याचा डबा आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी केला.