

कुल्लू : अनेक ठिकाणी प्रेमविवाहाला विरोध केला जातो आणि ‘ऑनर किलिंग’सारख्या घटना घडतात. अशा परिस्थितीत हिमाचल प्रदेशच्या कुल्लू खोऱ्यात वसलेले मलाना हे गाव वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे.
सध्या एका ट्रॅव्हल ब्लॉगरच्या व्हिडीओमुळे या गावाचा एक वेगळा पैलू समोर आला आहे. मलाना गाव पळून आलेल्या प्रेमीयुगुलांसाठी सुरक्षित ठिकाण ठरत आहे. येथील ग्रामस्थांच्या मते, जे प्रेमीयुगुल घरच्यांच्या भीतीने पळून येतात, त्यांना हे गाव आश्रय देते. विशेष म्हणजे, गावकरी या युगुलांची ओळख गुप्त ठेवतात. त्यांना पूर्ण संरक्षण देतात. जोपर्यंत त्यांना सुरक्षित वाटत नाही, तोपर्यंत ते या गावात राहू शकतात.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. जे लोक आधी या गावाला मागासलेले म्हणत होते, ते आता येथील लोकांच्या उदार मनाचे कौतुक करत आहेत. याअगोदर गावात असणाऱ्या कडक नियमांमुळे गावकऱ्यांवर टीका होत असे. याचे मुख्य कारण म्हणजे, मलाना गावाची सर्वात मोठी ओळख म्हणजे येथील ‘नो टच पॉलिसी.’ या गावात प्रवेश करताच तुम्हाला एक वेगळाच नियम पाळावा लागतो.
येथील लोक बाहेरील व्यक्तींशी थेट शारीरिक संपर्क टाळतात. तुम्ही येथील कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला स्पर्श करू शकत नाही. अगदी दुकानातून काही खरेदी केले तरी पैसे हातात न देता जमिनीवर ठेवावे लागतात. दुकानदारही वस्तू जमिनीवरच ठेवतो. या विचित्र वाटणाऱ्या नियमामुळे अनेकांनी याला अस्पृश्यता म्हणत टीकाही केली होती.