Karnataka Politics : भेट एकत्र, चर्चा स्वतंत्र! राहुल गांधींच्या विमानतळावरील 'त्या' १० मिनिटांच्या चर्चेने राजकीय हालचालींना वेग

सत्तावाटपाचा गोंधळ तत्काळ दूर करा ः शिवकुमारांची राहुल गांधींकडे मागणी
Karnataka Politics
म्हैसूर : विमानतळावर राहुल गांंधींचे स्वागत करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे नेते. दुसऱ्या छायाचित्रात शिवकुमार राहुल गांधींशी स्वतंत्रपणे चर्चा करताना.
Published on
Updated on

बंगळूर : विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तावाटपाच्या सूत्राला चिकटून राहिलेले उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी गोंधळ तत्काळ दूर करण्याची विनंती काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. तामिळनाडू दौरा आटोपून दिल्लीला जाण्यासाठी म्हैसूर विमानतळावर आलेल्या राहुल गांधी यांच्याशी स्वतंत्र चर्चेदरम्यान शिवकुमार यांनी राज्य काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या गोंधळाकडे लक्ष देण्याची मागणी केली. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेही विमानतळावर उपस्थित असताना शिवकुमारांनी राहुल यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करणे पसंत केले. सत्तावाटपासह अनेक मुद्द्यांवर गेल्या काही दिवसांपासून राहुल यांची भेट घेण्याचे प्रयत्न करणाऱ्या शिवकुमार यांनी प्रथमच त्यांच्याशी स्वतंत्र बोलून लक्ष वेधले.

म्हैसूर विमानतळावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काही मंत्री उपस्थित असतानाही त्यांना सोडून विमानतळाच्या दुसऱ्या कोपऱ्यात शिवकुमार त्यांच्याशी काही वेळ बोलले. त्यांनी राज्यातील काही घडामोडी राहुल यांच्या लक्षात आणून दिल्या. सत्ता हस्तांतरण आणि मंत्रिमंडळ फेररचना या नावाने काही मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. तो लवकरात लवकर दूर करावा, अशी विनंती केली.

सरकार स्थापनेच्या वेळी झालेल्या करारानुसार हायकमांडने निर्णय घ्यावा. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रेकॉर्डब्रेक कारकीर्द केली आहे. मात्र, सत्ता सोडण्याबाबत कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्याऐवजी हायकमांड जे सांगेल त्याप्रमाणे ऐकणार असल्याचे ते सांगत आहेत. म्हणून हायकमांडने तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

सत्ता हस्तांतरणावरील अडचण सुटेपर्यंत मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत कोणतीही प्रक्रिया राबवू नये, असे मुख्यमंत्र्याना पटवून देण्याची विनंती शिवकुमारांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्ष सज्ज होत असताना सरकार स्तरावर निर्माण झालेला गोंधळ कार्यकर्त्यांवर मोठा परिणाम करेल. म्हणून हायकमांडचा हस्तक्षेप अपरिहार्य आहे, असे त्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.शिवकुमार यांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय न घेता राहुल गांधी यांनी 27 जानेवारीनंतर आपल्या कार्यालयाशी संपर्क साधून वेळ पाहून दिल्लीला यावे, असे शिवकुमारांना सांगितले.

सत्ता हस्तांतराबाबत चर्चा नाहीच

सत्ता हस्तांतरण आणि मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत प्रदेश काँग्रेसमध्ये असलेला गोंधळ सध्या तरी दूर होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. राज्य सरकारला हजार दिवस पूर्ण झाल्यानिमित्त 13 फेब्रुवारी रोजी हावेरी येथे आयोजित साधना मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

तामिळनाडूला एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी खास विमानाने म्हैसूरला पोहोचल्यानंतर विमानतळावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते तामिळनाडूला रवाना झाले. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हावेरीमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या साधना मेळाव्याची माहिती दिली. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केंद्र सरकारने मनरेगा योजना रद्द केल्याच्या विरोधात पक्षाने आयोजित केलेल्या जनआंदोलनाची माहिती दिली. या दोन्ही मुद्द्यांचे कौतुक व्यक्त करताना राहुल गांधी यांनी त्यांचे अभिनंदन केले. हावेरी येथे होणाऱ्या कार्यक्रमात सहभागाबद्दल लवकरच कळवू असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news