Nashik Simhastha Kumb Mela : कुंभमेळा दर १२ वर्षांनीच का येतो? जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्याचे महत्त्व

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहणाने होईल औपचारिक शुभारंभ
Nashik Simhastha Kumb Mela
Nashik Simhastha Kumb Mela Pudhari News Network
Published on: 
Updated on: 

Nashik Kumbh Mela : जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा अशी कुंभमेळ्याची ओळख आहे. प्राचीन काळापासून दर १२ वर्षांनी भरणार्‍या कुंभमेळ्याला हिंदू परंपरेमध्ये मानाचे स्थान आहे. हा केवळ धार्मिक मेळावा नाही, तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. संपूर्ण जगामध्ये एक अलौकिक उत्सव अशी त्‍याची ओळख आहे. हरिद्वार, प्रयाग, नाशिक आणि उज्जैन या चारही पावन तीर्थक्षेत्रांच्या प्रत्येक स्थानी दर बारा वर्षांनी हा भव्य मेळा भरतो. यंदा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा औपचारिक शुभारंभ ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने होणार आहे. या दिवशी आखाड्यांचे धार्मिक विधी आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू होईल. जाणून घेऊया दर १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व....

अमृत कुंभयोग

कुंभमेळ्याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. यातील सर्वात महत्त्वाची कथा म्हणजे समुद्रमंथन! पुराणग्रंथांनुसार, हिमालय पर्वताच्या उत्तरेकडे प्राचीन काळी देव आणि दैत्यांनी अमृतासाठी समुद्रमंथन केले होते. या महामंथनासाठी मंथनदंड हा 'मंदर पर्वत' होता, रज्जू (दोर) म्हणून 'वासुकी नाग' होता आणि खुद्द भगवान श्रीविष्णूंनी 'कूर्म' (कासव) रूप धारण करून मंदर पर्वताला आपल्या पाठीवर धारण केले होते. समुद्रमंथनाच्या या पावन प्रसंगी अनुक्रमे पुष्पक रथ, ऐरावत हत्ती, पारिजात पुष्प, कौस्तुभ मणी, सुरभी गाय आणि शेवटी अमृतकुंभ घेऊन खुद्द भगवान धन्वंतरी प्रकट झाले होते. तो अमृतकुंभ त्यांनी इंद्राला प्रदान केला. इंद्राने तो आपल्या पुत्र जयंताकडे सोपवला. देवांच्या सल्ल्यानुसार जयंत तो कुंभ घेऊन स्वर्गाच्या दिशेने वेगाने धावला. हे पाहून दैत्याचार्य क्रोधित झाले आणि त्यांनी दैत्यांना आदेश दिला की, बळाने तो कुंभ त्याच्याकडून हिसकावून घ्या. त्यानंतर भयंकर संग्राम झाला. सतरा दिवस चाललेल्या या भीषण युद्धानंतर देवांचा पराभव झाला. याच दरम्यान, पृथ्वीवरील अनेक गुप्त ठिकाणी तो अमृतकुंभ लपवण्यात आला होता. ज्या चार पावन स्थानांवर तो कुंभ ठेवण्यात आला होता, तेव्हा अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले. ते अमृताचे थेंब जिथे पडले ती ठिकाणे आहेत: हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक; म्हणून या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो.

कुंभमेळा दर १२ वर्षांनी का होतो?

कुंभमेळ्याच्या तारखा खगोलीय घटनांवर आधारित असतात. गुरू ग्रह आणि सूर्याची स्थिती यांचा कुंभमेळ्याशी परस्पर संबंध आहे. गुरू कुंभ राशीत आणि सूर्य मकर राशीत असतील, तेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो. गुरू ग्रहाला त्याच्या कक्षेत फिरण्यासाठी १२ वर्षांचा कालावधी लागतो, म्हणून कुंभमेळा दर १२ वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. ज्योतिषशास्त्रात १२ राशी असतात. या १२ राशी १२ महिने दर्शवितात, ज्या वेळ आणि मानवी जीवनाशी संबंधित आहेत. कुंभ राशीत गुरू आणि सूर्य आल्यानंतर कुंभमेळा आयोजित केला जातो. त्याचबरोबर १२ वर्षांचे चक्र मानवी जीवनात एक विशेष ऊर्जा-परिवर्तन करते. हा कालावधी आत्मशुद्धी, श्रद्धा आणि ध्यानासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो.

Nashik Simhastha Kumb Mela
Simhastha Kumbh Mela Nashik | विश्वविक्रमी शंखनादाने आणि ध्वजारोहण सोहळ्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या स्वागताला प्रारंभ

लाखो भाविकांचा मेळा

प्राचीन काळापासून भारतवासियांच्या मनात अग्रस्थानी आहेत ती पवित्र तीर्थक्षेत्रे. यामध्ये काशी, पुरी, प्रयाग, कुरुक्षेत्र, नैमिषारण्य, अयोध्या, वृंदावन, मथुरा, द्वारका, हरिद्वार, नाशिक, उज्जैन आदींचा समावेश होतो. महाकुंभ हा शास्त्रांनी निर्देशित केलेल्या राशी, नक्षत्र आणि ग्रहांच्या पावन संयोगावर निर्धारित होतो. कुंभमेळा हा खरोखरच एक अत्यंत अद्भुत असा सोहळा आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात या पावन धार्मिक मेळ्याची साद पोहोचते आणि तिथून असंख्य भाविक अत्यंत व्याकुळ भावाने या धर्मामृताचे आस्वादन करण्यासाठी येतात. अमृताचे थेंब हरिद्वारच्या ब्रह्मकुंडात, उज्जैनमध्ये शिप्रा नदीच्या काठावर आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या किनारी पडले होते, असे मानले जाते. त्‍यामुळे गंगाद्वार (हरिद्वार), प्रयाग, धारा (उज्जैन), गोदावरी (नाशिक) या चारही पवित्र तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दर तीन वर्षांनी कुंभयोग येतो आणि साधारणपणे दर बारा वर्षांनी एका विशिष्ट ठिकाणी 'कुंभ महामेळ्याचे' भव्य आयोजन केले जाते.

Nashik Simhastha Kumb Mela
Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील 63 धार्मिक संस्थांचा होणार कायापालट

साधू-संमेलन ही कुंभमेळ्याची खरी प्राणशक्ती

साधू-संमेलन हीच मुळात कुंभमेळ्याची खरी प्राणशक्ती आहे. इथे जमणारा भाविकांचा अथांग जनसागर केवळ तीर्थस्नानासाठी येत नाही, तर त्याहून अधिक तो साधू-महात्म्यांच्या दर्शनाची आकांक्षा बाळगून येतो. हजारो-लाखोंच्या संख्येने तपस्वी साधूंचा विराट संगम जिथे होतो, तिथेच खऱ्या अर्थाने अमृताचा पाझर फुटतो! अशा प्रकारे कुंभमेळा हा खरोखरच 'अमृतवर्षाव' ठरतो. पुराणांतील रूपक अशा प्रकारे प्रत्यक्ष वास्तवात अवतरलेले दिसते.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचे धार्मिक महत्त्व

महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर नाशिक शहर वसलेले आहे. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी यांसारख्याच गोदावरी नदीलाही हिंदू संस्कृतीत परम पवित्र मानले गेले आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानली जातात. समुद्रमंथनादरम्यान कलशातून पडलेल्या अमृताच्या थेंबांमुळे या ठिकाणांचा कुंभमेळ्याच्या चार प्रमुख स्थळांमध्ये समावेश करण्यात आला. गोदावरी नदीत स्नान करणे, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे आणि संतांच्या सान्निध्यात राहणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. त्यामुळे दरवर्षी सिंहस्थ कुंभामध्ये लाखो भाविक श्रद्धेने पवित्र स्नान करण्यासाठी येतात.

Nashik Simhastha Kumb Mela
Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थासाठी 1,282 एकर खासगी जमिनीचे तात्पुरते भूसंपादन

ध्वजारोहणाने होईल सिंहस्थ कुंभमेळ्याचा औपचारिक शुभारंभ

जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा औपचारिक शुभारंभ ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने होणार आहे. या दिवशी आखाड्यांचे धार्मिक विधी आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू होईल. त्यानंतर संपूर्ण कुंभमेळ्यात आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरणाची अनुभूती घेता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news