

M for Masjid N for Namaz Madhya Pradesh nursery book
रायसेन (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील एका खासगी शाळेने दिलेल्या बालपाठ्यपुस्तकातील मजकुरावरून वाद उफाळून आला आहे.
नर्सरी वर्गातील मुलांना दिलेल्या चार्टमध्ये ‘M फॉर मशीद’, ‘N फॉर नमाज’, ‘K फॉर काबा’, ‘AU फॉर औरत इन हिजाब’ असे इस्लामी संदर्भ असलेले शब्द वापरण्यात आल्याने पालक आणि स्थानिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
एका विद्यार्थ्याच्या काकांनी घरी त्याचे शिक्षण चार्ट पाहताना मजकुराकडे लक्ष दिले तेव्हा ही बाब समोर आली आणि त्याबद्दल कुटुंबीयांमध्ये चिंता व्यक्त केली.
या प्रकारामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि काही पालकांनी शाळेसमोर धडक दिली आणि इस्लामी शब्द व उर्दू भाषेचा वापर शालेय शिक्षणात होतोय, असा आक्षेप घेतला. त्यांच्या मते, अशा प्रकारे विशिष्ट धार्मिक तत्वज्ञानाचे बालवयात प्रबोधन करणे हे शिक्षणाच्या मूळ उद्दिष्टाला हरताळ फासणारे आहे.
शाळेचे मुख्याध्यापक ई. ए. कुरेशी यांनी हे चार्ट भोपाळ येथून आणण्यात आले होते, असे स्पष्ट करत सांगितले की, त्यांनी मजकूर तपासल्याशिवायच तो वितरित केला. वाद झाल्यानंतर तातडीने सर्व पालकांना हे चार्ट शाळेत परत करण्यास सांगण्यात आले आहे.
या प्रकरणावरून विशेषतः नर्सरीच्या वयातील मुलांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक साहित्याचा प्रकार अत्यंत जबाबदारीने निवडला गेला पाहिजे, असा सूर अनेक शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांनी व्यक्त केला आहे.
कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी नरेंद्र गोयल यांनी माहिती मिळताच पोलिस पथकासह शाळेत धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी आंदोलक पालक व एबीव्हीपी कार्यकर्त्यांना जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला.
यापूर्वी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या ‘पीडीए पाठशाळां’बाबतही अशीच चर्चा झाली होती. तिथे “A for अखिलेश यादव”, “B for बाबासाहेब आंबेडकर”, “M for मुलायमसिंह यादव” असे राजकीय नेत्यांच्या नावांद्वारे इंग्रजी अक्षरांची ओळख करून दिली जात होती.
समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी यामागे समाजिक-जागरूकता आणि राजकीय समज वाढवण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले होते. या शाळा भाजप सरकारच्या काळात बंद पडलेल्या सरकारी शाळांच्या विरोधात सुरू करण्यात आल्या होत्या.