LPG Price: सरकार म्हणतंय भारतातच सिलिंडर सर्वात स्वस्त! शेजारील आणि विकसित देशांमध्ये एलपीजी गॅस कितीला मिळतोय?

केंद्र सरकारने दावा केला आहे की, या वाढीनंतरही शेजारील देशांच्या आणि जगातील अनेक विकसित देशांच्या तुलनेत भारतात अजूनही एलपीजी सिलिंडर सर्वात स्वस्त आहे.
LPG Cylinder
LPG CylinderPudhari
Published on
Updated on

LPG Price

नवी दिल्ली: देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात थेट २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांतील हा दुसरा मोठा दरवाढ आहे. दरम्यान, या दरवाढीचे समर्थन करताना केंद्र सरकारने दावा केला आहे की, या वाढीनंतरही शेजारील देशांच्या आणि जगातील अनेक विकसित देशांच्या तुलनेत भारतात अजूनही एलपीजी सिलिंडर सर्वात स्वस्त आहे.

तीन महिन्यांत दुसरा झटका; 'उज्ज्वला' लाभार्थ्यांना दिलासा

जागतिक पातळीवरील तणाव आणि 'होर्मुझची सामुद्रधुनी' बंद झाल्यामुळे उद्भवलेल्या तेल-गॅस संकटामुळे गेल्या तीन महिन्यांत ग्राहकांना महागाईचा हा दुसरा झटका बसला आहे. यापूर्वी ७ मार्च रोजी सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता ७ जून रोजी पुन्हा २९ रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र, 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने'अंतर्गत अनुदान मिळणाऱ्या ग्राहकांसाठी हा सिलिंडर ६४२ रुपयांनाच उपलब्ध असणार आहे.

LPG Cylinder
LPG Price Hike: LPG सिलेंडर पुन्हा महागला! घरगुती गॅसच्या दरात 29 रुपयांनी वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका

विकसित आणि शेजारील देशांपेक्षा भारतात गॅस स्वस्त: पेट्रोलियम मंत्रालय

गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता लक्षात घेता केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने तातडीने स्पष्टीकरण जारी केले आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात एलपीजीचे दर पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका या शेजारील देशांपेक्षा कमी आहेत. एवढेच नव्हे तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा सारख्या विकसित देशांच्या तुलनेतही भारतीय ग्राहकांना खूपच कमी किंमत मोजावी लागत आहे.

या देशांमधील दर भारतापेक्षा जास्त आहेत

सरकारने विविध देशांमधील घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतींबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. यावरून हे स्पष्ट होते की, तीन महिन्यांत दोनदा दरवाढ होऊनही भारतात एलपीजी सिलिंडरचे दर कमीच आहेत. शेजारील देश पाकिस्तानमध्ये १४.२ किलोच्या एका सिलिंडरसाठी १०४६ रुपये मोजावे लागत आहेत. तर नेपाळमध्ये हाच दर १२०७ रुपये, बांगलादेशात सुमारे १२२५ रुपये आणि श्रीलंकेत १२४१ रुपये इतका आहे. केवळ शेजारील देशच नव्हे, तर जगातील बलाढ्य आणि विकसित देशांमध्येही गॅसचे दर भारतापेक्षा दुप्पट ते तिप्पट आहेत. अमेरिकेत एलपीजी सिलिंडर सुमारे १७५५ रुपयांना मिळत असून, ऑस्ट्रेलियात हा दर सुमारे १७६५ रुपये आणि कॅनडात तब्बल २४११ रुपयांवर पोहोचला आहे. या तुलनेत भारतात सबसिडीशिवाय मिळणारा ९४२ रुपयांचा सिलिंडर बराच स्वस्त असल्याचे सरकारने म्हटले आहे.

प्रत्येक सिलिंडरवर सरकारला ७०० रुपयांचा तोटा

सरकारी आकडेवारीनुसार, सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे एका गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याचा प्रत्यक्ष खर्च १६०० रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. परंतु, ग्राहकांवर याचा पूर्ण भार न टाकता सरकार प्रत्येक सिलिंडरवर सुमारे ७०० रुपयांचे नुकसान स्वतः सहन करत आहे.

दरवाढीचे मुख्य कारण काय?

फेब्रुवारी ते जून २०२६ दरम्यान सौदी सीपी बेंचमार्क दरांमध्ये तब्बल ४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. आखाती देशांमधून होणाऱ्या गॅस पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने वाहतूक आणि पुरवठा खर्च प्रचंड वाढला आहे. हा वाढीव खर्च अंशतः भरून काढण्यासाठीच किरकोळ विक्री दरात सुधारणा करून सिलिंडरची किंमत ९४२ रुपये करावी लागल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

LPG Cylinder
Goa news LPG price hike | एलपीजी दरवाढीमुळे खाद्यपदार्थ महागले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news