

Fake identity love trap case
भोपाळ : हिंदू असल्याचे भासवून एका मुस्लिम तरुणाने विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने महिलेला पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले. यानंतर तो तिच्याबरोबर लिव्ह-इनमध्ये राहू लागला. मात्र, आरोपीचे खरे नाव उघड होताच त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मध्य प्रदेशातील रतलाम येथील इंडस्ट्रियल एरिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'इंडिया टूडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, रतलाममधील पीडित महिलेची २०२० मध्ये आरोपीशी ओळख झाली होती. त्यावेळी आरोपीने आपले नाव 'सोनू' असल्याचे सांगून तो हिंदू असल्याची बतावणी केली होती. जून २०२३ मध्ये त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू झाला. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्यास प्रवृत्त केले.
आरोपीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून पीडितेने जुलै २०२३ मध्ये पतीला सोडले. पीडिता आपल्या वडिलांकडे राहू लागली. त्यानंतर सप्टेंबर २०२३ पासून आरोपी आणि पीडिता एका भाड्याच्या खोलीत लिव्ह-इनमध्ये राहू लागले. या काळात फोनवरील संभाषणावरून पीडितेला समजले की, ज्याला ती 'सोनू' समजत होती, त्याचे खरे नाव 'इम्रान' असून तो मुस्लिम आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये पीडितेचा पतीसोबतचा घटस्फोट अधिकृतरीत्या मंजूर झाला. त्यानंतर तिने इम्रानकडे लग्नाबाबत विचारणा केली. त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. २६ डिसेंबर २०२५ रोजी या विषयावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी इम्रानने तिची फसवणूक केल्याचे मान्य करत, "जर पोलिसात गेली तर तुला जीवे मारीन," अशी धमकी दिली.
पीडितेने २९ डिसेंबर रोजी रात्री उशिरा पोलीस ठाणे तक्रार दिली. तिने आरोप केला आहे की, इम्रानने तिची ओळख 'पत्नी' म्हणून करून दिली आणि तिच्यावर अनेकवेळा शारीरिक अत्याचार केले. पोलिसांनी आरोपी इम्रानविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी इम्रान हा यापूर्वी अमली पदार्थ तस्करीच्या (Narcotics) एका प्रकरणात जामिनावर बाहेर होता. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.