

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी 8 डिसेंबर दुपारी १२ वाजता 'वंदे मातरम्' च्या १५० व्या वर्षपूर्ती दिनानिमित्त विशेष चर्चा सुरू होईल. मागील आठवड्यात या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे या आठवड्यात अधिवेशन सुरळीत चालण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेची सुरुवात करणार आहेत.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधी पक्षांनी एसआयआरवर चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र व्यापक स्वरूपात निवडणूक सुधारणा या विषयावर लोकसभेत मंगळवारी चर्चा घेण्याचे ठरले. तत्पूर्वी सोमवारी वंदे मातरम्' च्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त चर्चा करण्याचे ठरले. या माध्यमातून सरकार विरोधकांना शांत ठेवत कामकाज चालवण्याच्या प्रयत्न करेल. मात्र ही चर्चा, विशेषता मंगळवारी होणारी चर्चा वादळी होण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीने 'वंदे मातरम्' या विषयावर चर्चेसाठी दहा तासांची तरतूद केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी चर्चेची सुरुवात करणार आहेत. सरकार या चर्चेला राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाशी जोडून एक व्यापक राजकीय संदेश देऊ इच्छित आहे, अशाही चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहेत.