Anant Shastra:
नवी दिल्ली: संरक्षण क्षेत्रात स्वदेशीला मोठे प्रोत्साहन देत, भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर हवाई संरक्षण मजबूत करण्यासाठी 'अनंत शस्त्र' या जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या पाच ते सहा रेजिमेंट खरेदी करण्यासाठी निविदा काढली आहे.
भारतीय लष्कराने ही निविदा भारत सरकारच्या मालकीची संस्था भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला दिली आहे. डीआरडीओने अनंत शस्त्र ही एअर डिफेन्स सिस्टम विकसीत केली आहे. सुमारे ३०,००० कोटी रुपये अंदाजित खर्च असलेल्या या प्रकल्पामुळे भारतीय लष्कराच्या आर्मी एअर डिफेन्सला बळकटी मिळेल. ज्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानी ड्रोन हल्ले थोपविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मे महिन्यात 'ऑपरेशन सिंदूर' कारवाई झाल्यानंतर लगेचच संरक्षण अधिग्रहण परिषदेने स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्याच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. ही अत्यंत गतिशील आणि चपळ प्रणाली पश्चिम आणि उत्तरेकडील दोन्ही सीमेवर तैनात केली जाईल.
ही प्रणाली अत्यंत गतिमान आहे. चालत्या स्थितीत लक्ष्यांचा शोध घेण्याची आणि मागोवा घेण्यास सक्षम आहे. तसेच थोडावेळ थांबून गोळीबार करू शकते.
लहान विश्रांतीदरम्यानही क्षेपणास्त्र प्रक्षेपित करता येते.
सुमारे ३० किमीच्या रेंजसह, ही प्रणाली सध्याच्या MRSAM आणि आकाश प्रणालीला असलेल्या लहान ते मध्यम पल्ल्यात पूरक ठरेल.
या क्षेपणास्त्र प्रणालीची दिवस आणि रात्र अशा दोन्ही परिस्थितीत चाचणी घेण्यात आली आहे.
पाकिस्तानसोबतच्या चार दिवसांच्या संघर्षादरम्यान, भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स युनिट्सने L-70 आणि Zu-23 एअर डिफेन्स गनने बहुतेक ड्रोन नष्ट केले होते, तर आकाश, MR-SAM आणि हवाई दलाच्या स्पायडर व सुदर्शन S-400 प्रणालींनीही महत्त्वाची भूमिका बजावली.