

Samir Modi
नवी दिल्ली: इंडियन प्रीमिअर लीगचे (IPL) संस्थापक आणि पहिले अध्यक्ष ललित मोदीचा भाऊ आणि प्रसिद्ध उद्योजक समीर मोदीला लैंगिक अत्याचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी ते भारतात परतले आणि दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच त्यांना अटक करण्यात आली.
गेल्या महिन्यात समीर मोदीच्या कर्मचाऱ्याने लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी ते परदेशात होते, त्यामुळे त्यांच्याविरोधात 'लुकआउट सर्क्युलर' जारी करण्यात आले होते. दरम्यान, समीर मोदीला न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी तीन दिवसांची रिमांड मागितली होती, जेणेकरून त्याला गुन्हा घडलेल्या ठिकाणी घेऊन जाता येईल आणि त्याचा मोबाईल फोन जप्त करता येईल. मात्र, समीर मोदी याच्या वकिलांनी ते निर्दोष असून त्यांना खंडणी मागणाऱ्या व्यक्तीने जाणीवपूर्वक यात अडकवले असल्याचा दावा न्यायालयात केला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, समीर मोदी याने प्रमोशन आणि नोकरीत अधिक चांगल्या संधी देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. हे अत्याचार त्यांचे घर, कार्यालय आणि काही हॉटेल्समध्ये झाल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपायुक्त हेमंत तिवारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.