

Donald Trump
लंडन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेलिकॉप्टरला गुरुवारी ब्रिटन दौऱ्यावरून परत येत असताना इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. 'मरीन वन' या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही घटना घडली. ब्रिटनमधील आपला दौरा संपवून ट्रम्प स्टॅनस्टेड विमानतळाकडे परतत असताना ही घटना घडली.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरमध्ये 'मायनर हायड्रॉलिक बिघाड' झाला होता. “खबरदारी म्हणून, वैमानिकांनी स्टॅनस्टेड विमानतळावर पोहोचण्यापूर्वी एका स्थानिक हवाईतळावर हेलिकॉप्टर उतरवले. ट्रम्प यांनी त्यानंतर दुसऱ्या हेलिकॉप्टरमधून प्रवास केला,” असेही त्या म्हणाल्या.
या घटनेमुळे 'मरीन वन'ला ल्युटन येथे उतरवण्यात आले, जिथे आपत्कालीन सेवा आधीच सज्ज होत्या. 'मरीन वन' आणि त्याच्यासोबत असणारी इतर हेलिकॉप्टर्स विशेष ‘व्हाईट टॉप्स’ म्हणून ओळखली जातात. ही हेलिकॉप्टर्स मिसाईल डिफेन्स सिस्टीम आणि रडार जॅमिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. या हेलिकॉप्टर्ससोबत सहसा 'ग्रीन टॉप्स' म्हणून ओळखली जाणारी ऑस्प्रे एमव्ही-२२ हेलिकॉप्टर्स असतात, ज्यात मदतनीस कर्मचारी, गुप्त सेवा एजंट आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक उपकरणे असतात.
ट्रम्प यांच्या या ब्रिटन भेटीदरम्यान त्यांचे आणि ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर यांचे संबंध सौहार्दाचे राहिले. या भेटीत दोन्ही देशांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान करारावर स्वाक्षरी केली. तसेच, अमेरिकेने ब्रिटनमध्ये १५० अब्ज पाउंडच्या नवीन गुंतवणुकीचे स्वागत केले. याव्यतिरिक्त युक्रेन, गाझा आणि आयात शुल्क यांसारख्या मुद्द्यांवरही चर्चा झाली.