

Ladakh off Roading Fine: लडाखमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात स्टंटबाजी करणे काही पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. पॅंगॉन्ग तलाव आणि वन्यजीव क्षेत्रांमध्ये नियम मोडल्याबद्दल प्रशासनाने त्यांना थेट तुरुंगाची हवा दाखवण्यासोबतच प्रत्येकी ५०-५० हजार रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे.
लडाखच्या सुंदर दऱ्याखोऱ्या, शांत पॅंगॉन्ग तलाव आणि तिथली थंड हवा... आयुष्यात एकदा तरी इथे जावे, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र, काही पर्यटक असेही असतात, जे लडाखच्या शांत वातावरणात हुल्लडबाजी करतात आणि पर्यावरणाला हानी पोहोचवतात. असाच एक प्रकार समोर आला आहे, जिथे रील्स बनवण्याच्या नादात कोणी पॅंगॉन्ग तलावाच्या पाण्यात आपली 'थार' पळवत आहे, तर कोणी वाइल्डलाईफ सेंच्युरीच्या (वन्यजीव अभयारण्य) शांत वातावरणात 'फॉर्च्युनर' चालवून मुक्या प्राण्यांना घाबरवत आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत लडाख प्रशासनाने पहिल्यांदाच अत्यंत कडक पाऊल उचलले आहे, ज्यामुळे हुल्लडबाजांचे धाबे दणाणले आहेत. लडाख केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने पॅंगॉन्ग तलाव आणि इतर वन्यजीव क्षेत्रांमध्ये बेकायदेशीरपणे ऑफ-रोडिंग करणाऱ्या चार पर्यटकांना एकूण २ लाख रुपयांचा, म्हणजेच प्रत्येकी ५०-५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासोबतच त्यांच्या चारही गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. लडाखमध्ये अशी कडक कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लेह वाइल्डलाईफ डिव्हिजन अंतर्गत येणाऱ्या चार वेगवेगळ्या संवेदनशील भागांत हे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पॅंगॉन्ग तलावाच्या किनाऱ्यावरील मेराक आणि लुकुंग, हान्तेमधील नुरबू ला, आणि नुब्रा व्हॅलीतील सुमुर या भागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अनेक आरोपींना त्यांच्या सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ आणि रील्सच्या माध्यमातूनच पकडण्यात आले.
तलावाच्या पाण्यात उतरवली थार : २३ जून रोजी पॅंगॉन्ग तलावाच्या स्वच्छ पाण्यात पंजाब पासिंगची (PB) एक महिंद्रा थार स्टंट आणि रील्स बनवण्यासाठी धावण्यात आली, ज्यामुळे तिथल्या पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले.
अभयारण्यात क्रेटा: २१ जून रोजी चांगथांग कोल्ड डेझर्ट वाइल्डलाईफ सेंच्युरी अंतर्गत लुकुंगजवळ उत्तर प्रदेश पासिंगची (UP) ह्युंदाई क्रेटा बेकायदेशीर ऑफ-रोडिंग करताना आढळली. या गाडीला चांगला पास जवळ अडवून जप्त करण्यात आले.
नदीच्या पात्रातून थार धावली: २० जून रोजी काराकोरम वाइल्डलाईफ सेंच्युरीमध्ये नदीच्या वेगवान प्रवाहातून पंजाब पासिंगची आणखी एक थार नेण्यात आली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही गाडी पकडण्यात आली.
फॉर्च्युनरने प्राण्यांचा थरकाप उडवला: सर्वात धक्कादायक प्रकार १७ जून रोजी घडला. चांगथांग सेंच्युरीमध्ये एका हिमाचल पासिंगच्या (HP) टोयोटा फॉर्च्युनर गाडीने दुर्मिळ 'तिबेटी गझेल' (एक प्रकारची हरणाची प्रजाती) या प्राण्याचा पाठलाग केला. पोलीस आणि वाइल्डलाईफ टीमने रात्रभर शोधमोहीम राबवून ही गाडी हान्ते येथील एका होमस्टेमधून शोधून काढली.
लडाखचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्या निर्देशानुसार ही कडक कारवाई करण्यात आली आहे. पकडलेले आरोपी हिमाचल प्रदेश, चंदीगड, पंजाब आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. या सर्वांवर वन्यजीव संरक्षण कायदा, अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोठा दंड वसूल केल्यानंतरच या गाड्या सोडण्यात आल्या."लडाख जगभरातील पर्यटकांचे स्वागत करतो, परंतु पर्यटकांनी जबाबदार नागरिक म्हणून वागले पाहिजे. संरक्षित वन्यजीव क्षेत्रांमध्ये ऑफ-रोडिंग करणे हा दंडनिय गुन्हा आहे. पर्यावरण आणि दुर्मिळ वन्यजीवांना हानी पोहोचवणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील," असा इशाराही उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना दिला आहे.