Goa Nightclub Fire
Goa Nightclub Fire | हडफडेत अग्नितांडव 25 मृत्यू; दोन बडे अधिकारी निलंबितFile Photo

Goa Night Club Fire | चार सरकारी अधिकारी निलंबित; मूळ जमीन मालक यूकेला पसार

Goa Night Club Fire | हडफडे दुर्घटनेत आतापर्यंत 10 संशयितांना अटक; नाईट क्लबचे तीन संशयित व्यवस्थापक सशर्त जामिनावर
Published on
Summary
  1. हडफडे येथील नाईट क्लब अग्निकांडाला दीड महिना उलटूनही चौकशी सुरूच

  2. लुथरा बंधूंसह १० जण अटकेत; ईडीकडून दिल्लीतील ८–९ ठिकाणी छापे

  3. बेकायदेशीर नाईट क्लबमुळे २० कर्मचारी व ५ पर्यटकांचा मृत्यू

  4. व्यापार व अबकारी परवाने बोगस असल्याचे तपासात उघड

  5. चार सरकारी अधिकारी निलंबित, अनेकांवर नोटिसा

पणजी : विलास महाडिक

हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ नाईट क्लबमधील भीषण अग्निकांडाला दीड महिना उलटून गेला आहे. पोलिस आणि सरकारी प्रशासन आपापल्या पातळीवर या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आतापर्यंत या नाईट क्लबचे मालक लुथरा बंधूंसह एकूण १० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी नाईट क्लबचे काही व्यवस्थापक सशर्त जामिनावर आहेत. चार सरकारी अधिकारी निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाला अप्रत्यक्षपणे जबाबदार असलेल्या संबंधित खात्यातील अनेक अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

Goa Nightclub Fire
Goa Book Exhibition | वाचनसंस्कृती ही राष्ट्र एकतेची पायाभरणी

पोलिस आणि सरकारी यंत्रणा चौकशी करत असतानाच आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लुथरा बंधूंंसह त्यांचे क्लबमधील भागीदार अजय गुप्ता, हडफडे–नागोया पंचायतीचे अपात्र माजी सरपंच रोशन रेडकर, बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर आणि इतरांवर दिल्लीतील ८ ते ९ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची चौकशी सुरू आहे.

गोव्यात घडलेल्या या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाऱ्या या नाईट क्लबमुळे २० कर्मचारी आणि ५ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेची दखल राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी घेतल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आणि दंडाधिकारी चौकशी समिती नेमण्यात आली.

या नाईट क्लबमध्ये ये-जा करण्यासाठी केवळ एकच प्रवेशद्वार असल्याने अनेकांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. बेकायदेशीर असतानाही या नाईट क्लबला व्यापार परवाना कसा मिळाला, याचा तपास सुरू आहे.

लुथरा बंधू सौरभ आणि गौरव हे आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) उद्योगातील उद्योजक असून त्यांच्याकडे ‘रोमियो लेन’, ‘बर्श’, ‘मामाज बॉई’ आणि ‘काया’ या ब्रँड्सअंतर्गत रेस्टॉरंट्स, बार आणि क्लब्सचा मोठा व्यवसाय आहे. त्यांनी २०१५ मध्ये दिल्लीतील हडसन लेन येथील ‘मामाज कुओई’ या कॅफेमधून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. त्यानंतर ‘रोमियो लेन’सह व्यवसायाचा वेगाने विस्तार झाला. सध्या त्यांची उपस्थिती गोवा तसेच दुबई, लंडनसारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणांसह देशातील ३० हून अधिक शहरांमध्ये आहे.

अजय गुप्ता हे दिल्लीस्थित व्यापारी असून गोव्यातील ‘बर्च बाय रोमियो लेन’ नाईट क्लबचे सह-मालक आणि अप्रत्यक्ष भागीदार आहेत. पोलिसांनी त्यांना दिल्लीतून ताब्यात घेतले आहे. ‘मुसा’ हे नाव नाईट क्लबच्या वस्तू आणि सेवा कर (GST) कागदपत्रांवर आढळून आले असून त्यामुळे व्यवसायाशी त्यांचा अधिकृत संबंध स्पष्ट होतो.

हे अधिकारी निलंबित…

गोवा सरकारने आतापर्यंत निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सिधी हळर्णकर (माजी पंचायत संचालक), डॉ. शमिला मौतेरो (राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव), रघुवीर बागकर (हडफडे–नागोया पंचायतीचे माजी सचिव), चैतन्य साळगावकर (वैज्ञानिक सहाय्यक) आणि विजय हरिश्चंद्र कानसेकर (कनिष्ठ पर्यावरण अभियंता) यांचा समावेश आहे. यापैकी रघुवीर बागकर याला हणजूण पोलिसांनी अटक केली आहे.

अबकारी परवानाही बोगस…

नाईट क्लबसाठी घेण्यात आलेला अबकारी परवानाही बोगस असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यासाठी सादर करण्यात आलेला कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचा ‘ना हरकत दाखला’ देखील बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे व्यापार परवाना आणि अबकारी परवाना दोन्ही बोगस ठरले असून लुथरा बंधू आणि अजय गुप्ता यांच्याविरोधात म्हापसा पोलिस स्थानकात बनावट कागदपत्रांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लुथरा बंधूंनी हडफडे प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला असून बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. हे दोन्ही अर्ज न्यायालयात प्रलंबित असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. अजय गुप्ता आणि राजीव मोडक हे न्यायालयीन कोठडीत असून रोशन रेडकर आणि रघुवीर बागकर हे पोलिस कोठडीत आहेत.

Goa Nightclub Fire
GTDC Tourism Initiative | 'लोकभवन मार्गदर्शित पर्यटन फेरी' ठरली लक्षवेधी

हडफडे–नागोयाच्या माजी सरपंचालाही अटक…

आतापर्यंत हणजूण पोलिसांनी एकूण १० जणांना अटक केली आहे. त्यामध्ये क्लबचे मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा, गुंतवणूकदार व भागीदार अजय गुप्ता, मुख्य महाव्यवस्थापक राजीव मोडक, महाव्यवस्थापक विवेक सिंग, गेट व्यवस्थापक प्रियांशु ठाकूर, व्यवस्थापक राजवीर सिंघानिया, देखरेख अधिकारी भरत कोहली, हडफडे–नागोयाचे माजी सरपंच रोशन रेडकर आणि माजी सचिव रघुवीर बागकर यांचा समावेश आहे. यापैकी राजवीर सिंघानिया, प्रियांशु ठाकूर आणि भरत कोहली हे सशर्त जामिनावर आहेत.

लुथरा बंधू कोठडीत…

नाईट क्लबला आग लागली त्या रात्री लुथरा बंधू दिल्लीत होते. दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी पहाटे थायलंडला पलायन केल्याचे तपासात उघड झाले. इंटरपोलच्या मदतीने १० दिवसांनंतर गोवा पोलिसांना त्यांना अटक करण्यात यश आले. गेल्या महिन्याभरापासून ते कोठडीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news