

Ladakh blooms with Lilium and Gladiolus flowers
जम्मू : अनिल साक्षी
बर्फाच्छादित पर्वत, रखरखीत जमीन आणि प्रतिकूल हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या लडाखमध्ये आता रंगीबेरंगी फुलांचे अनोखे विश्व आकाराला आले आहे. लेहजवळील चोगलमसर आणि स्टकना येथे समुद्रसपाटीपासून तब्बल १० हजार ६०० फूट उंचीवर विकसित केलेल्या दोन फुलांच्या शेतांमध्ये तब्बल २५ लाखांहून अधिक उच्च मूल्याची फुले बहरली आहेत. लडाख प्रशासनाने या दोन्ही शेतांना जगातील सर्वाधिक उंचीवरील 'द्विन फ्लॉवर फिल्ड' म्हणून संबोधले आहे.
चोगलमसर येथील फ्लॉवर गार्डन १८ सप्टेंबरपासून सर्वसामान्यांसाठी खुले केले आहे. प्रौढांसाठी प्रवेश शुल्क २५ रुपये, तर मुलांसाठी १० रुपये आहे. एकूण ४० एकर क्षेत्रात विस्तारलेल्या या दोन्ही फुलांच्या शेतांमध्ये सुमारे २४ लाख लिलियम आणि एक लाख ग्लॅडिओलसची लागवड केली आहे. लडाखसारख्या कठोर हवामानाच्या प्रदेशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक फुलांची लागवड करण्याचा हा पहिलाच मोठा प्रयोग आहे.
दोन महिन्यांत उभे राहिले फूलशेत लडाखचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या हस्ते या फुलांच्या शेतांचे उद्घाटन झाले. चोगलमसर येथील फ्लॉवर फिल्ड अवघ्या दोन महिन्यांत विकसित केले आहे. येथे १६ जुलैपासून रोपांची लागवड सुरू केली आणि सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात फुले उमलण्यास सुरुवात झाली. स्टकना येथे १४ लाख लिलियमची लागवड केली आहे. येथे ऑक्टोबरअखेरीस फुलांची पहिली मोठी खेप उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
पर्यटनासोबत उत्पन्नाचा नवा मार्ग
केवळ पर्यटकांना आकर्षित करणे एवढाच या प्रकल्पाचा उद्देश नाही, तर शेतकरी आणि तरुणांना आधुनिक फूल शेतीचे प्रशिक्षण देऊन उत्पन्नाचे नवे स्रोत आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण करणे, हा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात स्वयंसहायता गट आणि सहकारी संस्थांना या उपक्रमाशी जोडण्यात येणार आहे.
लिलियमच्या एका डहाळीला ६० ते ७० रुपये
उच्च मूल्याच्या फुलांमध्ये लिलियमला मोठी मागणी आहे. घाऊक बाजारात लिलियमच्या एका डहाळीची किंमत सुमारे ६० ते ७० रुपये आहे. त्यामुळे या पिकातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा पर्याय मिळेल.