कोलकाता बलात्कार पीडितेच्या आई-वडीलांचे गंभीर आरोप

Kolkata Rape-Murder Case | पीडितेच्या आईचा धक्कादायक खुलासा
Kolkata doctor rape-murder case
कोलकाता बलात्कार पीडितेच्या आई-वडीलांचे गंभीर आरोपPudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: कोलकता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणाबाबत तिच्या वडीलांनी एएनआयला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी आम्हाला कोणीही सहकार्य करत नसल्याचे मृत महिला डॉक्टरांच्या वडीलांनी म्हटले आहे.

आम्हाला आशा आहे की, न्याय मिळेल

आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील बलात्कार-मृत्यू प्रकरणातील मृत डॉक्टरचे वडील म्हणतात, "जी चौकशी केली जात आहे, त्यातून कोणतेही परिणाम अद्याप आलेले नाहीत. पण आम्हाला आशा आहे की लवकरात लवकर आमच्या मुलीला न्याय मिळेल".

विभागाकडून कोणतेही सहकार्य नाही

आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील पीडीता काम करत असलेल्या विभागात कोणीही आम्हाला सहकार्य केले नाही. यात संपूर्ण विभागाचा सहभाग आहे, असा आरोप ही तिच्या वडीलांनी केला. स्मशानभूमीत तीन मृतदेह होते पण आमच्या मुलीच्या पार्थिवावर आधी अंत्यसंस्कार करण्यात आले, असेही त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या कृतीवर समाधानी नाही

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री केवळ न्याय देण्याचे बोलत आहेत, मात्र न्याय मागणाऱ्या सर्वसामान्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न याठिकाणी केला जात आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रिया आणि कृतीवर समाधानी नाही. आम्ही कोणतीही भरपाई घेण्यास नकार दिला आहे...", असेही पीडीतेच्या वडीलांनी म्हटले आहे.

पीडितेच्या आईची धक्कादायक माहिती

पीडितेच्या आईने एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळी त्या म्हणाल्या, "आधी आम्हाला हॉस्पिटलमधून तुमची मुलगी आजारी असल्याचा फोन आला, त्यानंतर कॉल डिस्कनेक्ट झाला. त्यानंतर मी पुन्हा फोन करून काय झाले, असे विचारले. तेव्हा असिस्टंट सुपरव्हायजरने आम्हाला तुमच्या मुलीने जीवन संपवल्याचे सांगितले. ती गुरुवारी ड्युटीवर गेली, शुक्रवारी सकाळी १०:५३ वाजता आम्हाला फोन आला. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाने आत सोडले नाही. आम्हाला 3 वाजता तिला पाहण्याची परवानगी दिली. यावेळी तिची पँट उघडी होती, अंगावर एकच कपडा होता. तिचा हात मोडला होता, तिच्या डोळ्यातून, तोंडातून रक्त येत होते. नुसतं बघून असं वाटत होतं की कुणीतरी तिचा खून केला आहे. मी त्यांना सांगितले की ही आत्महत्या नाही, खून आहे. आमच्या मुलीला डॉक्टर बनवण्यासाठी आम्ही खूप कष्ट केले पण तिची हत्या झाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

बरेच लोक यात सामील, पीडीतेच्या आईचा आरोप

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या फोनवर पीडीतेच्या आईने म्हटले आहे की, "त्यांनी (ममता बॅनर्जी) सांगितले की गुन्हेगाराला लवकरात लवकर अटक केली जाईल, परंतु अद्याप काहीही झाले नाही. एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मला खात्री आहे की आणखी बरेच लोक यात सामील आहेत. या घटनेला संपूर्ण विभाग जबाबदार आहे असे मला वाटते. मला असे वाटते की मुख्यमंत्री आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांनी आंदोलन करू नये म्हणून आज त्यांनी कलम 144 लागू केले आहे." अशी राज्य सरकारवर नाराजी देखील पीडीतेच्या आईने व्यक्त केली आहे.

काय आहे नेमकी घटना?

कोलकातामधील सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेजच्‍या सेमिनार विभागात शुक्रवारी, ९ ऑगस्‍ट रोजी पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी ३१ वर्षीय महिला डॉक्‍टरचा रक्तबंबाळ अवस्थेतील अर्धनग्न मृतदेह आढळून आला होता. या घटनेने संपूर्ण कोलकता शहरात खळबळ उडाली. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ (दि.१३) देशभरातील निवासी डॉक्टरांनी बंद पुकारला होता. पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या मृत्यूचा पोस्टमॉर्टम अहवाल समोर आलाय. त्यांचा गळा दाबून हत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यांचा गळा दाबल्याने त्यांची थायरॉईड कास्थी (कूर्चा) ऊती तुटली. तसेच त्यांच्यावर नराधमाने विकृतपणे लैंगिक अत्याचार केल्याने त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खोल जखम आढळून आली असल्याचे चार पानी अहवालात म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news