

Trekker Survival Story
बंगळूरु : ट्रेकिंगची आवड एका तरुणीला घनदाट जंगलाच्या वाटेवर घेऊन गेली, पण एका चुकीच्या वळणाने तिचा प्रवास एका भीषण संकटात बदलला. ट्रेकिंगवेळी जंगलात अचानक तिची वाट चुकली. मोबाईलला नेटवर्क नाही, कोणाशीही संपर्क होण्याची चिन्हे धूसर आणि सोबत फक्त ५०० मिली पाण्याची बाटली... अशा अत्यंत कठीण परिस्थितीत केरळच्या ३६ वर्षीय जी. एस. शरण्या ट्रेकरने कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यातील घनदाट जंगलात तब्बल चार दिवस एकाकी काढले. विशेष म्हणजे, हा थरार अनुभवताना मनात भीतीचा लवलेशही नव्हता, असे तिने सुखरूप सुटका झाल्यावर सांगितले.
केरळमधील कोझिकोड येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली शरण्या २ एप्रिल रोजी १५ जणांच्या ग्रुपबरोबर 'ताडियांडमोल' शिखरावर ट्रेकिंगसाठी गेली होती. दुपारी हा ग्रुप बेसवर परतला; शरण्या गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली.
बचावल्यानंतर बंगळूरु येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना शरण्या म्हणाली, "'ताडियांडमोल' शिखरावरून खाली उतरताना मी रस्ता भरकटले. मी डावीकडील वाटेने गेले, पण तिथे कोणीही नव्हते. फोन बंद होण्यापूर्वी तिने एका सहकाऱ्याला संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला होता; पण हा प्रयत्न व्यर्थ ठरला! शरण्याने सांगितले की, ट्रेकिंगवेळी वाट चुकल्यानंतर मी पूर्णपणे एकाकी पडले होते. त्यावेळी शरण्याकडे फक्त अर्धा लिटरची पाण्याची बाटली होती. मोबाईलचे नेटवर्कही नव्हते. पहिल्या दिवशी मी संध्याकाळपर्यंत चालत राहिले, पण पुढे दाट जंगल असल्याने मी एका ओढ्यापाशी थांबले."
"'ताडियांडमोल' शिखर परिसर हे हत्तींचा अधिवास असलेले जंगल आहे. जंगलात वाट चुकल्यानंतर सलग तीन दिवसांत तिला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. मानवी वस्ती किंवा रस्ता सापडेल या आशेने अधूनमधून ती पुढे जात राहिली. हत्तींसारख्या वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या आणि पावसाची संततधार असलेल्या या भागातही शरण्या डगमगली नाही. ती म्हणाली, "मला भीती वाटली नाही, का ते माहीत नाही."
पहिला दिवस: डोंगराच्या माथ्यावर काही लोक दिसले, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना शरण्या अधिकच घनदाट जंगलात गेली. रात्री पावणेसातच्या सुमारास फोन बंद झाला आणि पायात वेदना होत असल्याने तिने ओढ्याकाठीच मुक्काम केला.
दुसरा दिवस: कोणाचे लक्ष जाईल किंवा ड्रोनद्वारे शोध घेतल्यास आपण दिसू शकू, या आशेने ती मोकळ्या जागेत थांबली.
तिसरा आणि चौथा दिवस: तिसऱ्या दिवशी उंचावर जाण्याचा विचार होता, पण पावसाने व्यत्यय आणला. रविवारी दुपारपर्यंत ती कपडे सुकण्याची वाट पाहत होती आणि अधूनमधून मदतीसाठी ओरडत होती.
शरण्या बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच वन विभाग, पोलीस, नक्षलविरोधी पथक (ANS) आणि स्थानिक आदिवासींच्या नऊ टीम्सनी शोधमोहीम सुरू केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सूचनेनुसार थर्मल ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर करण्यात आला. अखेर ७२ तासांच्या शोधकार्यानंतर रविवारी दुपारी एका दुर्गम भागात स्थानिक आदिवासींना शरण्याचा आवाज ऐकू आला आणि त्यांनी तिला शोधून काढले. हा असा भाग होता जिथे सामान्यतः कोणीही जात नाही. शरण्या पूर्णपणे शुद्धीत आणि स्थिर होती. वैद्यकीय तपासणीनंतर ती सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना कर्नाटकचे मंत्री ईश्वर खंड्रे म्हणाले की, ट्रेकिंगवेळी जंगलात बेपत्ता झालेली शरण्या एक धैर्यवान आणि साहसी तरुणी आहे. जंगलातील मोबाईल नेटवर्कच्या अभावामुळे तिचा शोध घेणे कठीण झाले होते. मात्र शोध मोहिमेतील सर्वांनीच प्रयत्नांची पराकाष्ठा करत शरण्याची सुखरूप सुटका केली. बेपत्ता ट्रेकरला शोधणे ही सरकारची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.