

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुलांचा ट्रेकिंगमधील उत्साह… स्वतःची जिद्द आणि मुलांकडून मिळालेल्या प्रेरणेच्या जोरावर पुण्यातील 70 वर्षीय आजींनी चार किल्ल्यांवरील ट्रेक पूर्ण केला आहे. मंगल जोशी असे या आजींचे नाव असून, त्यांची दोन मुले आणि मीनल जोशी- मिरपागार या मुलीकडून प्रेरणा घेऊन हा उपक्रम केला आहे. या उपक्रमात मंगल जोशी यांनी तिकोना, पुरंदर, रायरेश्वर व लोहगड असे 4 ट्रेक पूर्ण केले आहेत. त्यांची मुलगी मीनल जोशी यांनीही आत्तापर्यंत तब्बल 17 ट्रेक पूर्ण केले आहेत. मीनल जोशी यांनी वयाच्या 15 व्या वर्षांपासून ट्रेकला सुरुवात केली. मध्यंतरी काही वर्षे खंड पडल्यानंतर वयाच्या चाळिशीनंतरही रुबी हॉल क्लिनिकचा ग्रुप, जोडीदार आणि मुलांसहित त्या आपला छंद जोपासत आहेत.
मीनल जोशी यांनी आत्तार्पंत राजगड, तोरणा, रायगड, रायरेश्वर, ढाकचा बहिरी, अदराई जंगल ट्रेक, सांधन व्हॅली, राजमाची, पुरंदर, वासोटा, जरंडेश्वर, कमळगड, कोरीगड, कात्रज ते सिंहगड, नळीची वाट मार्गे हरिश्चंद्र गड (हा ट्रेक करताना मार्गात येणारे दोन अतिशय अवघड रॉक पॅच दोराच्या सहाय्याने चढायचे होते तेही पाठीवर सामान असलेली सॅक घेऊन), खिरेश्वर मार्गे हरिश्चंद्र गड, कळसूबाई शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. हिमाचल प्रदेशमधील डेहराडून जवळचे रूपीन पास ट्रेक, गंगोंत्री तपोवन ट्रेक पूर्ण केला आहे.