

killer elephant dhurbe nepal kills four members of same family over 14 years
पुढारी ऑनलाईन : एका हिंसक हत्तीने तब्बल 14 वर्षांच्या कालावधीत एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, पहिल्या हल्ल्यानंतर हे कुटुंब पुन्हा कधीही त्या हत्तीचा सामना होऊ नये या आशेने आपले गाव सोडून दूर राहायला गेले होते. मात्र, तरीही त्यांची सुटका झाली नाही.
एखाद्याच्या मागे लागणे किंवा सूड उगवणे ही प्रवृत्ती सहसा माणसांमध्येच पाहायला मिळते. प्रेम, मत्सर किंवा वैर यामुळे काही लोक वर्षानुवर्षे संधीची वाट पाहतात. पण अशीच प्रवृत्ती एखाद्या वन्य प्राण्यात दिसली तर त्याचे परिणाम किती भीषण असू शकतात, याचे हे उदाहरण आहे.
ही कथा माणसांतील वैराची नसून एका जंगली हत्तीची आहे. या हिंसक हत्तीने एका कुटुंबाचा अक्षरशः विनाश केला. एका हल्ल्यात एक नव्हे, तर तब्बल 14 वर्षांत वेगवेगळ्या वेळी त्या कुटुंबातील सदस्यांना लक्ष्य करून त्यांचा जीव घेतला.
नेपाळच्या चितवन राष्ट्रीय उद्यानाजवळील माडी शहरात राहणाऱ्या शनिचरा बोते यांच्या कुटुंबासाठी डिसेंबर 2012 हा काळ भयावह ठरला. काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, धुरबे नावाच्या हिंसक हत्तीने शनिचरा यांच्या आई-वडिलांना चिरडून ठार मारले. मात्र, या घटनेनंतरही त्या हत्तीचा हिंसक स्वभाव कमी झाला नाही.
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर शनिचरा बोते यांनी कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राप्ती नदी ओलांडून सुमारे 9 मैल दूर असलेल्या जगतपूर येथे नव्याने वास्तव्यास सुरुवात केली.
काही वर्षे सर्व काही सुरळीत सुरू होते. कुटुंबाला वाटले की आता ते सुरक्षित आहेत. मात्र, या महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा एकदा दुर्दैव त्यांच्या दारात आले.
काठमांडू पोस्टच्या माहितीनुसार, धुरबे हत्ती जगतपूरमधील त्यांच्या घरात शिरला आणि शनिचरा बोते यांची 25 वर्षीय सून आशिका बोते तसेच चार वर्षांचा नातू भरत बोते यांना चिरडून ठार मारले.
शनिचरा बोते यांनी सांगितले, "राप्ती नदी ओलांडल्यानंतर आम्ही सुरक्षित आहोत, असा आमचा विश्वास होता. पण अनेक वर्षांनंतर तोच हत्ती आमच्या नव्या घरापर्यंत आला आणि माझी सून व लहान नातवाचा जीव घेतला. आता आम्हाला पळून जाण्यासाठीही कोणतीच जागा उरलेली नाही."
या ताज्या हल्ल्यानंतर धुरबे हत्तीने एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा 14 वर्षांत बळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. धुरबे हा नेपाळमधील सर्वाधिक कुप्रसिद्ध आणि हिंसक हत्तींंपैकी एक मानला जातो. गेल्या अनेक वर्षांत त्याच्याकडून अनेक प्राणघातक हल्ले झाल्याची नोंद आहे.
चितवन राष्ट्रीय उद्यान प्रशासनाच्या माहितीनुसार, 2010 पासून आतापर्यंत धुरबेच्या हल्ल्यांमध्ये किमान 25 जणांचा मृत्यू झाला आहे. उद्यानाचे प्रतिनिधी अबिनाश थापा मगर यांनी सांगितले की, जगतपूरमधील या दोन ताज्या मृत्यूपूर्वी धुरबेने 23 जणांचा बळी घेतला होता. या घटनेनंतर मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे.
धुरबे या हत्तीचे स्वतंत्र विकिपीडिया पानही असून, त्यामध्ये त्याच्यामुळे झालेल्या 25 मृत्यूंचा उल्लेख करण्यात आला आहे.
वन्यजीव अधिकाऱ्यांनी पुढील हल्ले टाळण्यासाठी धुरबेवर अनेक वर्षांपासून सतत लक्ष ठेवले आहे. 2016 मध्ये त्याला शोधून त्याच्या गळ्यात ट्रॅकिंग कॉलर बसवण्यात आला होता. नंतर तो कॉलर निकामी झाल्याने 2020 मध्ये नवीन कॉलर लावण्यात आला आणि 2023 मध्ये तो पुन्हा बदलण्यात आला. या माध्यमातून त्याच्या हालचालींवर सातत्याने नजर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.