

शशिकांत सावंत
कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, वैभववाडी-कोल्हापूर, कराड-चिपळूण रेल्वेने जोडले गेल्यावर कोकण रेल्वे एक शक्तिमान रेल्वे मार्ग म्हणून पुढे येईल.
कोकण रेल्वेच्या 263 किमी लांबीच्या मार्गाचे टप्प्याटप्प्याने दुपदरीकरण करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. याबाबतचे सर्वेक्षण अंतिम टप्यात आहे. याचबरोबर कोकण रेल्वेमार्गाला पश्चिम महाराष्ट्र जोडण्यासाठी वैभववाडी-कोल्हापूर आणि कराड-चिपळूण या मार्गिका जोडण्याचा प्रस्तावही यात समाविष्ट आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वे एक शक्तिमान रेल्वे मार्ग म्हणून पुढे येईल. कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करावी असा प्रस्ताव कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्री असताना दिला होता. ही रेल्वे देशाच्या राष्ट्रीय प्रवाहात यावी, असे कारण त्यामागे होते. या प्रस्तावावर विचार सुरू राहिल्याने तो पुढे सरकलेला नाही; परंतु आता या रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. सर्वेक्षणही अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे दुपदरीकरणाचा हा महत्त्वाचा प्रस्ताव सकारात्मक दृष्टीने पुढे सरकला आहे.
कोकण रेल्वे रोहा ते ठोकूर हा ७४१ किमीचा मार्ग आहे. त्यातील रोहा ते वीर या जवळपास ६० किमी मार्गाचे दुपदरीकरण झाले आहे. उर्वरित ६८० किमीच्या मार्गांपैकी २६३ किमीचे दुपदरीकरण आता केले जाणार आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी ते माजोराडा या १५१ किमी टप्प्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. दुपदरीकरणासाठी जिथे बोगदे, पूल कमी आहेत असा भाग घेतला आहे. तसेच नव्याने भूसंपादनाची गरज भासणार नाही, असा भागही या दुपदरीकरणात आहे; मात्र नवीन दुपदरीकरणामध्ये आवश्यक तिथे नवीन बोगदे बांधले जाणार असल्याचे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे. कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक बोगदे आहेत. किमान तीन नवीन बोगदे बांधण्याचा प्रस्ताव आहे.
सिंगल बोगद्यामध्ये दुसऱ्या ट्रॅकसाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे नव्या बोगद्यांचा विचारही दुपदरीकरणात समाविष्ट आहे. रोहा-वीरबरोबरच मडगाव, माजोर्डा याचेही अल्पसे म्हणजेच ७ किमीचे दुपदरीकरण झाले. कोकण रेल्वे बोर्डाने ४ हजार ७०४ कोटींचा नूतनीकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. यामध्ये ५ वर्षांत २ नवीन बोगदे बांधणे, जुने ट्रॅक बदलणे आणि जियो टेक्निकल सुरक्षा निर्माण करणे अशा कामांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील दासगाव बोगद्याजवळ एआय यंत्रणा उभी केली जात आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या सुरक्षेला नवीन आयाम मिळणार आहे. एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. यामुळे मॉनिटरिंग सिस्टीममध्ये मोठे बदल होतील. ट्रॅकवर लहान दगड अथवा दरड कोसळली, तर त्याचा अलर्ट त्वरित जारी होईल. त्याचबरोबर ट्रॅकवर जनावरे आल्यास त्याचाही अलर्ट जारी होईल. यामुळे रेल्वेच्या सुरक्षा कवचामध्ये भक्कम वाढ होईल.
२०२२ मध्ये कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले. यामुळे इंधन खर्चात वार्षिक २०० कोटींची बचत झाली. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे या रेल्वेच्या फायद्यामध्येही चांगले सकारात्मक बदल झाले. गेल्या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेने १४०० विशेष गाड्या चालवल्या. यामध्ये गणपती स्पेशलसह हंगामी गाड्यांचाही समावेश आहे. साहाजिकच रेल्वेच्या अर्थकारणात सकारात्मक बदल झाला. रोरो सेवाही दिलासा देणारी ठरली. कोकण रेल्वे मार्गावरून दररोज ७५ गाड्या धावतात. यामध्ये ५६ प्रवासी १९ मालगाड्यांचा समावेश आहे. यातून दरवर्षी साडेतीन कोटी प्रवासी प्रवास करतात. कोकण रेल्वेचे आर्थिक गणित सक्षम होत आहे. वाहतूक क्षमता वाढवण्यासाठी २०१७ पासून १० नवीन स्थानके आणि ८ लूप लाईन्स उभारल्या. यामुळे वेगवान प्रवासाला चालना मिळाली. आता नवीन तीन स्थानके आणि १० अतिरिक्त लूप लाईन्स उभ्या केल्या जात आहेत.
यामध्ये बहिंदूर, मायेम, ग्रान्दे अशी स्थानके आणि गोकर्ण, होनावरा हरवाडा, हांकोला येथे अतिरिक्त लूप लाईन्सचा समावेश आहे. या नव्या विस्तारामुळे तासन् तास जे क्रॉसिंगसाठी खर्च होतात, हा वेळ वाचेल. सध्या या रेल्वे मार्गावर ९१ बोगदे आहेत. त्यात आणखी तीनची भर पडणार आहे. सध्या असलेल्या बोगद्यांची एकूण लांबी ८५ किलोमीटर एवढी आहे. सर्वात लांब बोगदा रत्नागिरीजवळ साडेसहा किलोमीटरचा आहे. सर्वात लहान बोगदा १०४ मीटरचा आहे. नव्याने दुपदरीकरणाचा प्रस्ताव मार्गस्थ होतो आहे, ही आनंदाचीच बाब आहे.