
Kerala Man wins lottery Jackpot of Rs 8.5 crore in Dubai
दुबई : डोक्यावरील कर्ज, विश्वासघाताचे प्रसंग आणि मानसिक ताण-तणावातून गेलेल्या वेंगुपाल मुळ्लचेरी यांनी दुबई विमानतळावर खरेदी केलेल्या लॉटरीच्या एका तिकिटाने त्यांचं आयुष्य बदलले आहे. 15 वर्षांपासून ते स्वतःचे नशीब आजमावत होते.
केरळच्या एका मध्यमवर्गीय कुटूंबातील 52 वर्षीय मुळ्लचेरी यांनी दुबई ड्युटी फ्रीच्या 'मिलेनियम मिलिअनेअर' ड्रॉमध्ये तब्बल 8.5 कोटी रुपयांचा (1 मिलियन डॉलर) जॅकपॉट जिंकला आहे.
अजमान (UAE) येथे राहणारे आणि IT सपोर्ट स्पेशालिस्ट म्हणून काम करणारे वेंगुपाल, गेल्या 15 वर्षांपासून या लकी ड्रॉमध्ये सहभागी होत होते.
23 एप्रिल रोजी भारतातील कुटुंबाची भेट घेऊन परतताना दुबई विमानतळावर त्यांनी हे लॉटरीचे तिकीट खरेदी केले आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्याला मोठे वळण मिळाले आहे.
खलीज टाईम्सशी बोलताना वेंगुपाल म्हणाले, “ही रक्कम जिंकणं म्हणजे एक जणू फार मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. माझ्यासाठी एक कठीण पर्व संपून आता आशा आणि आनंदाने भरलेलं नवीन पर्व सुरू होत आहे.”
वेंगुपाल म्हणाले की, “माझ्यावर खूप मोठं कर्ज होतं, कारण अलीकडेच मी एक घर बांधलं होतं. त्यातच एका जवळच्या व्यक्तीकडून झालेला विश्वासघात मला मानसिकदृष्ट्या खूपच डगमगवून गेला. अशा वेळी आलेला हा जॅकपॉट खरंच आयुष्य वाचवणारा ठरला.”
वेंगुपाल यांना दोन अपत्ये आहेत. ते म्हणाले, “सर्वप्रथम मी माझं सगळं कर्ज फेडणार आहे आणि कुटुंबासोबत एक मोकळा, हवाहवासा सुट्टीचा काळ घालवणार आहे. त्यानंतर यूएईमध्ये परत येऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार आहे.
कुटुंबालाही इथे आणायचं आहे. यूएई माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. इथून बाहेर पडून कुठेही इतरत्र राहणं मला शक्य नाही.”
वेंगुपाल हे दुबई ड्युटी फ्रीच्या 'मिलेनियम मिलिअनेअर' ड्रॉचे 500 वे विजेते ठरले आहेत. त्यांच्या चिकाटी आणि संयमाचेही कौतूक केले जात आहे.
सध्या त्यांच्या या यशोगाथेची चर्चा सोशल मीडियावर जोरात असून, आर्थिक संकटात असलेल्या अनेकांसाठी वेंगुपाल यांचं यश एक प्रेरणादायक उदाहरण ठरत आहे.