नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेविषयी केंद्र सरकारने आधीच धोक्याचा इशारा दिला होता. मात्र, केरळमधील डाव्या आघाडीच्या सरकारने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी (दि.३१) या मुद्यावर राज्यसभेत बोलताना दिला. (Wayanad Landslide)
वायनाडच्या भूस्खलन दुर्घटनेत बळी पडलेल्या लोकांच्या कुटुंबाविषयी संवेदना व्यक्त करताना अमित शहा म्हणाले की, वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची दुर्घटना होऊन त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू होण्याची संभावना असल्याचा धोक्याचा इशारा केंद्र सरकारच्या आणीबाणी व्यवस्थापन विभागाने २३ जुलैरोजीच केरळ सरकारला दिला होता. २४ आणि २५ जुलैरोजी पुन्हा इशारा देऊन २६ जुलैरोजी तर २० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस आणि भूस्खलनाची दुर्घटना होईल, असा स्पष्ट इशारा दिला होता. मात्र, केरळ सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले. (Wayanad Landslide)
ओरिसा राज्यात यापूर्वी नवीन पटनायक यांचे सरकार असतानाच्या काळात केंद्र सरकारने सात दिवसांपूर्वीच या राज्यात चक्रीवादळ येण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार राज्य सरकारने उपाययोजना केल्यामुळे केवळ एका व्यक्तीचा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. गुजरात सरकारलाही आम्ही तीन दिवसांपूर्वीच चक्रीवादळाची पूर्वसूचना दिली होती. त्यामुळे तिथे एका पक्षाचाही मृत्यू झाला नसल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.