Wayanad Landslides | वायनाडमध्ये 'जलप्रलय'; ६० ठार, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

भूस्खलनामुळे मोठा विध्वंस
Wayanad Landslides
वायनाडमध्ये जलप्रलयfile photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकीकडे देशातील अनेक राज्ये पावसासाठी प्रार्थना करत असताना दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. आसाम ते केरळपर्यंत मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, मंगळवारी पहाटे केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. भूस्खलनामुळे अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढली गेली. या घटनेत आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणि लष्करासह अनेक यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे.

केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचा जोर वाढला असून, भारतीय हवामान खात्याने मध्य आणि उत्तर केरळमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सोमवारी केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, ज्यामुळे अनेक भागात मोठी जीवितहानी आणि गंभीर नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. दिवसभर संततधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा परिणाम वायनाड आणि कोझिकोड या उत्तरेकडील जिल्ह्यांवर झाला. वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळील डोंगराळ भागात सोमवारी मध्यरात्री भूस्खलन झाले. अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढली गेली. मध्यरात्री २ वाजता आणि पुन्हा पहाटे चार वाजता, असे दोनवेळा भूस्खलन झाले.

अचानक झाडे पडायला लागली आणि...

चुरलमाला येथील जखमी झालेल्या एका वृद्धाने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, त्याची पत्नी बेपत्ता आहे आणि ती कुठे आहे हे त्यांना माहीत नाही. ते म्हणाले की आम्ही घरात झोपलो होतो. अचानक मोठा आवाज झाला आणि अचानक आमच्या घराच्या छतावर मोठमोठे दगड आणि झाडे पडू लागली. सर्व दरवाजे तोडून पुराचे पाणी घरात शिरले. मला कोणीतरी वाचवले आणि रुग्णालयात नेले, पण माझ्या पत्नीबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

चुरलमाला येथील आणखी एका रहिवाशाने सांगितले की, 'जमीन अजूनही थरथरत आहे. काय करावे हे समजत नाही. इथे खूप गोंगाट आहे. येथून यायला मार्ग नाही. आम्हाला वाचवा,' अशी विनंती ते करत होते.

विलांगडू बाजूला दरड कोसळल्याने मलंगडू पूल वाहून गेला. चार घरांचे नुकसान झाले असून, पूल वाहून गेल्याने १२ कुटुंबे अडकून पडली आहेत, तर एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे वडकारा येथील काँग्रेस खासदार शफी पारंबिल यांनी सांगितले. मुंडक्काई, चूरलमला, अट्टामाला आणि नूलपुझा ही गावे भूस्खलनामुळे प्रभावित भागात आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबांना विविध छावण्यांमध्ये किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या घरी हलवण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस खासदार राहुल गांधी, गृहमंत्री अमित शहा यांनी भूस्खलनात अडकलेल्या लोकांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कर प्रमुखांशी बोलून भूस्खलनग्रस्त वायनाडमध्ये मदत आणि बचावासाठी सैन्य जमा करण्यास सांगितले आहे. लष्कराचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव कार्य सुरू केले आहे. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (KSDMA) ने म्हटले आहे की, अग्निशमन दल आणि NDRF च्या टीम्स बाधित भागात तैनात करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त NDRF टीम वायनाडच्या मार्गावर आहे. बचाव कार्यात मदत करण्यासाठी कन्नूर डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सच्या दोन पथकांना वायनाडला जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चुरलमला परिसरातील इमारतींचे नुकसान

भूस्खलन आणि पावसामुळे चुरमला भागात इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एनडीआरएफ, अग्निशमन, पोलीस आणि महसूल विभागाचे पथक बचावकार्य करत आहे. आतापर्यंत सुमारे २५० जणांना वाचवण्यात यश आले आहे. केरळ सरकारने मदतीसाठी भारतीय लष्कराच्या १२२ इन्फंट्री बटालियन (TA) मद्रासच्या बचाव पथकाची मागणी केली आहे. एक वैद्यकीय अधिकारी, दोन जेसीओ आणि ४० सैनिकांसह एक पथक बचाव कार्यात मदत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news