

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुसळधार पावसामुळे केरळमधील वायनाडलगत ४ वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलन होऊन त्यात मुंडक्काई, चुराल्मला, अट्टामाला आणि नूलपुझा ही ४ गावे मंगळवारी होत्याची नव्हती झाली. घरे, पूल, रस्ते ढिगाऱ्याखाली दबले. आतापर्यंत मृतांची संख्या १६१ पर्यंत पोहोचली आहे. या जलप्रकोपात चारशेवर लोक बेपत्ता असून, अडकलेल्यांना वाचविण्यासह मृतदेहांचा शोध सुरूच आहे. बेपत्ता लोकांची संख्या व गावांची विदारक परिस्थिती पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. दरम्यान, हवामान बदल आणि पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे वायनाडमध्ये विनाशकारी भूस्खलन झाले, असे अभ्यासात आढळून आले आहे.
पहिले भूस्खलन रात्री २ वाजता, तर दुसरे पहाटे ४.३० वाजता झाले, असे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले. यावेळी लोक गाढ झोपेत होते. त्यामुळे हानीचे प्रमाण अधिक तीव्र झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. केरळ सरकारने दोन दिवसांचा दुखवटाही जाहीर केला आहे. तामिळनाडू सरकारने मुख्यमंत्री निधीतून ५ कोटी रुपये बचाव कार्यासाठी जाहीर केले आहेत. वायनाडचे माजी खासदार तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तसेच प्रियांका गांधी यांनी वायनाडला भेट देणार असल्याचे जाहीर केले आहे.
वायनाड हे केरळमधील एकमेव पठारी क्षेत्र पश्चिम घाटात ७०० ते २,१०० मीटर उंचीवर हे पठार आहे. वायनाडची ५१ टक्के जमीन डोंगर उताराची आहे. अरबी समुद्रातून मान्सून आधी पश्चिम घाटावर आदळतो. त्यामुळे या भागात खूप जास्त पाऊस पडतो. काबिनी नदीची उपनदी मनंथवाडी ही ठोंडारमुडी शिखरावरून उगम पावते. ठोंडारमुडीला पूर आल्याने यावेळी मोठे नुकसान झाले.