

जम्मू : अनिल साक्षी
बारामुल्ला येथील रहिवासी रहीम फाजिली दररोज सकाळी उठून देवाकडे बर्फासाठी प्रार्थना करतो. त्याच्याप्रमाणेच, पाण्याअभावी ज्यांची शेते सुकत आहेत, त्यांचेही जीवन अत्यंत कठीण आहे आणि जे पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहेत, तेही अत्यंत कठीण परिस्थितीत आहेत. त्यांच्या प्रार्थना कधी ऐकल्या जातील हे कोणालाही माहिती नाही; परंतु हे निश्चित आहे की, जर काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाली नाही, तर काश्मीर वीज आणि पाण्यापासून वंचित राहील, तर पर्यटन उद्ध्वस्त होईल, अशी चर्चा आहे.
काश्मीरमध्ये हलकी बर्फवृष्टी झाली असली, तरी येत्या काळात वीज आणि पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तो पुरेसा नाही. खरं तर, काश्मीर पुन्हा एकदा तीव्र दुष्काळाचा सामना करत आहे. नद्या कोरड्या पडल्या आहेत. त्याचे परिणाम स्पष्ट आहेत. काश्मिरी लोकांना पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
१,१४० मेगावॅट वीजनिर्मिती
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्प १,१४० मेगावॅट वीजनिर्मिती करत आहेत. स्थानिक मागणी ३,००० मेगावॅटपेक्षा जास्त आहे. आता फक्त १०५ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. उर्वरित वीज बाहेरून खरेदी केली जात आहे आणि दीर्घ वीज कपात देखील होत आहे. सध्या ही मागणी पूर्ण होत आहे; परंतु बर्फाच्या लपाछपीमुळे सर्वांनाच भीती वाटत आहे.