

मुलीचे नाव बदलण्यासाठी दाखल केलेला दावा दिवाणी न्यायालयाने फेटाळला होता. या विरोधात वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
High Court On Name Change : "समाजातील प्रत्येक व्यक्तीची ओळख तिच्या नावाने होणे आवश्यक आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाचा स्वतःच्या नावाने ओळखले जाणे हा एक नागरी हक्क आहे. त्यामुळे, नावात सुधारणा किंवा बदल करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे, कारण ही बाब नागरी हक्काच्या निर्णयाशी संबंधित आहे," असे स्पष्ट करत कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकतेच एका अल्पवयीन मुलीला तिचे नाव बदलण्याची परवानगी नाकारणारा दिवाणी न्यायालयाचा निर्णय रद्द केला.
मुलीचे जन्माच्या वेळी नाव पालकांनी लक्ष्मी असे ठेवले होते. मात्र, ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रावरील श्रद्धेपोटी त्यांनी तिचे नाव बदलून 'वीणा' करण्याचा निर्णय घेतला होता. वडिलांनी मुलीचे नाव 'वीणा' असल्याचे घोषित करण्याची मागणी करणारा दिवाणी दावा दाखल केला.
मुलीच्या नावात बदल करण्याची वडिलांची मागणी दिवाणी न्यायालयाने फेटाळली. दिवाणी न्यायालयाने म्हटले की, "मुलीचे नाव बदलून 'वीणा' करावे हे दर्शवणारा कोणताही दस्तऐवज उपलब्ध नव्हता. नाव बदलण्यासाठी पालकांनी ती शिकत असलेल्या शाळेकडेही आधी संपर्क साधला नव्हता." या निकालाविरोधात अल्पवयीन मुलीने तिच्या वडिलांमार्फत कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
पालकांनी निदर्शनास आणून दिले की, कर्नाटक सरकारने एक परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार नाव बदलण्यासाठी दिवाणी न्यायालयाचा आदेश अनिवार्य होता. तसेच, प्रस्तावित नाव बदलाबाबत वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक सूचनाही वादींनी न्यायालयासमोर सादर केल्या. कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हंचटे संजीवकुमार यांनी स्पष्ट केले की, "कनिष्ठ न्यायालयाचा हा तर्क अयोग्य आहे, कारण वादीचे म्हणणे असे नाही की शाळेत प्रवेश घेताना सुरुवातीच्या टप्प्यावर तिचे नाव चुकीच्या पद्धतीने 'लक्ष्मी एन.' असे नोंदवले गेले होते. वादीला केवळ 'लक्ष्मी एन.' ऐवजी 'वीणा एन.' म्हणून ओळखले जावे अशी इच्छा आहे. त्यामुळे, 'वीणा एन.' हे नाव दर्शवणारा कोणताही दस्तऐवज सादर करण्याची आवश्यकताच उद्भवत नाही."
भारतातील प्रत्येक नागरिकाचा स्वतःच्या नावाने ओळखले जाणे, हा एक नागरी हक्क आहे. त्यामुळे, नावात सुधारणा किंवा बदल करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे, असे स्पष्ट करत संबंधित प्रकरणाच्या गुणवत्तेचा विचार करता, मुलीच्या पालकांनी मागणी केल्याप्रमाणे तिला नाव बदलण्याबाबतच्या घोषणेचा दिलासा मिळण्यास ती पात्र आहे. "त्यानुसार तिचे नाव 'लक्ष्मी एन.' वरून 'वीणा एन.' असे बदलले जाऊ शकते, असा आदेश पारित केल्यास अन्य कोणत्याही व्यक्तीला हानी पोहोचणार नाही. त्यामुळे, वादीचे नाव 'लक्ष्मी एन.' वरून 'वीणा एन.' असे बदलण्याचा दिलासा तिला मिळण्यास ती पात्र आहे," असा निर्णय न्यायालयाने दिला.