

Karnataka DGP Ramachandra Rao Viral Sleaze Video
बंगळूर: कर्नाटकचे पोलीस महासंचालक के. रामचंद्र राव यांना सोमवारी रात्री निलंबित करण्यात आले. वरिष्ठ आयपीएस अधिकारी राव आपल्या कार्यालयात महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे कथित अश्लील व्हिडिओंची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता आयजीपींचे महिलेशी अश्लील गप्पा मारतानाचे रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडियावर कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासांतच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या व्हिडिओंचा स्रोत आणि सत्यता अद्याप पडताळलेली नाही. चौकशीचा भाग म्हणून त्यांची तपासणी केली जाईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे. "कोणताही अधिकारी कायद्यापेक्षा मोठा नाही, तो कितीही वरिष्ठ असला तरी सखोल चौकशीनंतर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल," असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रामचंद्र राव हे त्यांच्या कार्यालयात एका महिलेशी अनुचित वर्तन करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वादात सापडले होतेच. त्यातच आता त्यांचे खासगी दोन ऑडिओ रेकॉर्डिंग देखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ज्यामध्ये राव एका महिलेशी गप्पा मारताना ऐकू आले आहे. त्यामध्ये अश्लील शब्द बोलल्याचेही ऐकायला येते.
राव यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावत, "हे व्हिडिओ बनावट, खोटे असून माझी बदनामी करण्यासाठी आणि माझे करिअर उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने तयार केले आहेत," असे म्हटले आहे. रामचंद्र राव हे अभिनेत्री आणि सोने तस्करी प्रकरणातील आरोपी रान्या राव हिचे वडील आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी गणवेशात असताना त्यांच्या अधिकृत चेंबरमध्ये वेगवेगळ्या महिलांसोबत जवळीक साधताना दिसत आहेत. कामाच्या वेळेतच डीजीपींच्या कार्यालयात हे गुप्त चित्रीकरण करण्यात आल्याचे समजते. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिला वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या पेहरावात कार्यालयात आल्याचे दिसून येते. अधिकृत काम सुरू असतानाच राव त्यांच्याशी जवळीक साधताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.