

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : टॅरिफवरून भारताला टार्गेट करीत असल्याच्या मुद्द्यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिका आणि युरोपियन युनियनला कडक शब्दांत सुनावले.
पोलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री राडोस्लाव सिकोर्स्की यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान जयशंकर यांनी ही भूमिका मांडली. यावेळी जयशंकर म्हणाले की, भारताला निवडकपणे लक्ष्य करणे चुकीचे आहे. भारताची चिंता केवळ अमेरिकेने लावलेल्या टॅरिफपुरती (व्यापार शुल्क) मर्यादित नसून, रशियन तेलाच्या खरेदीवरून पश्चिमेकडून येणार्या दबावाबद्दलही आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून रशिया हा भारताचा सर्वात मोठा कच्चे तेल पुरवठादार बनला आहे. 7 देशांनी रशियन तेलावर प्राईस कॅप (किंमत मर्यादा) लावली असली, तरी भारताने नेहमीच आपल्या गरजेनुसार जागतिक बाजारपेठेतून इंधन खरेदी करण्याचा अधिकार जपला आहे, असे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
अमेरिकेचा दबाव
गेल्या काही महिन्यांत अमेरिकेने भारतावर दबाव वाढवला आहे, ज्यामध्ये ऑगस्टमध्ये भारतावर लादलेल्या 25 टक्क्यांच्या अतिरिक्त दंडात्मक टॅरिफचा समावेश आहे. यामुळे भारताची रशियन तेलाची खरेदी मंदावली असून, अमेरिकेकडून कच्च्या तेलाची आयात सुमारे 60 टक्क्यांनी वाढली आहे.