

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : येत्या 26 जानेवारी रोजी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणार्या प्रजासत्ताक दिन संचलनात जम्मू-काश्मीरच्या 26 वर्षीय सिमरन बाला या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 140 पेक्षा जास्त पुरुष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व करणार आहेत. सीआरपीएफच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला अधिकारी संपूर्ण पुरुष तुकडीचे संचलन करताना दिसेल.
सिमरन बाला या जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. राजौरी जिल्ह्यातून सीआरपीएफमध्ये अधिकारीपदावर रुजू होणार्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांनी जम्मूच्या गांधीनगर येथील शासकीय महिला महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर यूपीएससीद्वारे घेण्यात येणारी सीएपीएफ असिस्टंट कमांडंट परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी स्वतःचे स्वप्न साकार केले.
नक्षलग्रस्त भागात पहिली नियुक्ती
सिमरन यांची जिद्द केवळ मैदानापुरती मर्यादित नाही. एप्रिल 2025 मध्ये दलात दाखल झाल्यानंतर, त्यांची पहिली नियुक्ती छत्तीसगडमधील अत्यंत आव्हानात्मक समजल्या जाणार्या ‘बस्तरिया बटालियन’मध्ये झाली. नक्षलविरोधी कारवायांसाठी ओळखल्या जाणार्या या भागात त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे. प्रशिक्षणादरम्यान त्यांना सर्वोत्कृष्ट अधिकारी आणि उत्कृष्ट वक्ता या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
नारीशक्तीचे दर्शन
प्रजासत्ताक दिन संचलनात केवळ सिमरन बालाच नव्हे, तर ‘डेअर डेव्हिल्स’ या नावाने ओळखली जाणारी महिलांची एक टीम बुलेट मोटारसायकलवरून चित्तथरारक कृत्य सादर करणार आहे. यामध्ये सीआरपीएफ आणि सीमा सुरक्षा बलाच्या महिलांचा समावेश असेल.
ऐतिहासिक नेतृत्व : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात 140 पुरुष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व करणार्या सिमरन बाला या पहिल्या महिला अधिकारी ठरतील.
राजौरीचा मान : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातून सीआरपीएफमध्ये अधिकारी होणार्या त्या पहिल्या महिला आहेत.
कर्तव्यनिष्ठा : सिमरन बाला सध्या छत्तीसगडमधील नक्षलविरोधी मोहिमेत ‘बस्तरिया बटालियन’मध्ये तैनात आहेत.
लष्करी सामर्थ्य : 26 जानेवारीला कर्तव्य पथावर भारताचे लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन संपूर्ण जगाला घडवले जाईल.