Crime News : सतत 'CCTV'ची नजर अन् १-१ रुपयाचा मागितला जायचा हिशेब; ६ लाखांची सुपारी देऊन सुनेनेच काढला सासऱ्याचा काटा!

नामांकित औषध व्यापाऱ्याचा खूनाचे गूढ उलगडले, नोकराने चाकूने केले होते तब्‍बल २६ वार

Kanpur businessman murder case
Kanpur businessman murder case : नामांकित औषध व्यापारी विनीत मनोचा यांच्‍या खुनाचे गूढ उलगडले आहे.Pudhari
Published on
Updated on

Kanpur businessman murder case : घरभर बसवलेले CCTV कॅमेरे, प्रत्येक हालचालीवर करडी नजर, रात्रीच्या लेट-नाईट पार्ट्यांना होणारा तीव्र विरोध आणि अगदी लहान-सहान खर्चासाठीही सतत मागणी करावी लागते, या सगळ्याचा राग तिच्या मनात धगधगत होता. अखेर तिच्या रागाचा कोणी कल्पनाही केली नव्हती असा भयंकर शेवट झाला. कानपूरमधील एका नामांकित औषध व्यापाऱ्याचा त्यांच्याच घरात तब्बल २६ वार करून अत्यंत अमानुषपणे खून करण्यात आला. या थरारक हत्याकांडाची सूत्रधार अन्य कोणी नसून घरची सूनच निघाल्याने पोलीसही हादरले.

६३ वर्षांच्या व्यापाऱ्याचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

शनिवारी रात्री कानपूरमधील उच्चभ्रू वस्तीतील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये ६३ वर्षीय औषध व्यावसायिक विनीत मनोचा यांची निघृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत CCTV फुटेज तपासले असता, पूर्वी घरात काम करणारा विशाल (वय ३०) आणि त्याचा साथीदार राज किशोर संशयाच्या भोवऱ्यात आले. रविवारी उशिरा रात्री पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. मात्र, विशालने पोलिसांसमोर जो धक्कादायक खुलासा केला, त्याने मनोचा कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. विनीत मनोचा यांची ३६ वर्षांची सून शालू हिनेच या हत्येची सुपारी दिल्याचा बनाव उघडकीस आला. सुरुवातीला पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शालूने खाकीचा हिसका दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली आहे.


Kanpur businessman murder case
Crime News : अंगाचा थरकाप उडवणारी घटना! पत्नीचे शिर कापून फ्रीजमध्ये ठेवले; पतीच्‍या अघोरी कृत्याने पोलीसही हादरले

रात्री पार्टीहून उशिरा आल्याने सासरा-सुनेमध्ये जोरदार भांडण

"घर श्रीमंत असूनही माझं जगणं नर्क झालं होतं," असा दावा शालूने चौकशीत केला. सासरे विनीत मनोचा यांनी घरात सर्वत्र CCTV लावून तिच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते. तिच्या लेट-नाईट पार्ट्या आणि उशिरा येण्यावर त्यांचा सक्त आक्षेप असायचा. स्वतःसह पतीच्या अगदी किरकोळ गरजांसाठीही सासऱ्यांपुढे हात पसरावे लागत असल्याने तिच्या मनात सासर्‍याविषयी तीव्र द्वेष निर्माण झाला होता. २८ जुलै रोजी एका पार्टीवरून उशिरा आल्याने सासरा-सुनेमध्ये जोरदार भांडण झाले. याच वादातून शालूच्या डोक्यात सासऱ्याचा काटा काढण्याचे भूत शिरले.


Kanpur businessman murder case
Crime News : गळा चिरलेला अन् शेवटचा श्वास... मृत्यूच्या दाढेतून महिलेने कागदावर रक्ताने लिहिले मारेकऱ्याचे नाव!

६ लाखांची सुपारी अन् ६ सप्टेंबरची 'डेडलाईन'

शालूने सासर्‍याने कामावरुन काढून टाकलेला नोकर विशालशी संपर्क साधला. त्‍याला सासऱ्याचा खून करण्यासाठी ६ लाख रुपयांची सुपारी दिली. त्यापैकी २ लाख रुपये ६ सप्टेंबरला आणि उरलेले ४ लाख रुपये १५ दिवसांनंतर देण्याचेही ठरले. शालूने घराच्या बनावट चाव्या बनवून विशालकडे सोपवल्या. ४ सप्टेंबरला जन्माष्टमीच्या दिवशी वस्तू देण्याच्या बहाण्याने विशालला बोलावून हत्येचा संपूर्ण 'प्लॅन' फायनल करण्यात आला.

सुनेने मारेकऱ्यांना घरात जाण्याचा मार्गच करून दिला

शनिवारी रात्री शालू, तिचा पती सुब्रत आणि मुलासोबत पार्टीसाठी बाहेर पडली. ती घराबाहेर पडताच अवघ्या काही मिनिटांत विशाल आणि राज किशोर अपार्टमेंटमध्ये पोहोचले. सिक्युरिटी गार्ड मदन याने त्यांना अडवले असता विशालने शालूला फोन लावला. "त्यांच्याकडे औषधे आहेत, त्यांना वर पाठवून दे," असे सांगून शालूने मारेकऱ्यांचा घरात आत घुसण्याचा मार्ग मोकळा केला.


Kanpur businessman murder case
Crime News : फोटोग्राफरच्‍या मृत्यूनंतरही प्रेयसीला येत राहिले २० दिवस मेसेज; एका बॅगने उघड केलं भयंकर सत्‍य!

उशीने गुदमरवायचं होतं, पण घडलं वेगळंच!

मारेकऱ्यांचा मूळ प्लॅन सासऱ्यांना उशीने गुदमरवून मारण्याचा होता, जेणेकरून तो हार्ट अटॅक वाटेल. दोघेही मुलाच्या बेडरूममध्ये लपून बसले होते; पण विनीत मनोचा अचानक खोलीत आले आणि प्लॅन अचानक बदलला. मारेकऱ्यांनी चाकूने त्यांच्यावर तब्बल २६ वार केले आणि रक्ताच्या थारोळ्यात सोडून पसार झाले.

पोलिसांनी व्यक्त केला एक संशय आणि खुनाचा 'मास्टरमाईंड' जाळ्यात

रात्री ३ वाजता पार्टीवरून परतल्यानंतर शालू आणि तिच्या पतीने रक्ताने माखलेला मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली. घरातील एकही मौल्यवान वस्तू चोरीला गेली नव्हती, त्यामुळे ही दरोड्याची घटना नसून व्यक्तिगत वैमनस्यातून झालेला खून असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. सुनेची सखोल चौकशी करता भयंकर सत्य समोर आले. आता या संपूर्ण खूनी कटाची माहिती विनीत मनोचा यांचा मुलगा सुब्रत याला होती का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याच्या कॉल डिटेल्सची सखोल चौकशी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news