

Kangana Ranaut On Sonia Gandhi: भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर त्यांच्या नागरिकत्वावरून टीका केली आहे. त्यांनी सोनिया आणि राजीव गांधी यांचा विवाह १९६८ मध्ये झाला होता मात्र त्यांनी भारताचं नागरिकत्व १९८३ मध्ये का स्विकारलं असा प्रश्न विचारला.
कंगना रनौतने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून सोनिया गांधी यांच्या विदेशी असल्याचा, भारताचे नागरिकत्व स्विकारण्याचा मुद्दा पुढे करत गांधी घराण्यातील झालेल्या मृत्यूशी देखील त्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. नुकतेच सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र बिलाँगिंग अ जर्नी ऑफ लव्ह प्रकाशित झाले आहे. त्यात अनेक ऐतिहासिक संदर्भ देत त्याबाबत नव्याने मांडणी करण्यात आली आहे.
यावरच भाजप खासदार कंगना रनौत यांनी भाष्य केलं आहे. कंगना रनौत आपल्टा इन्स्टा स्टोरीत लिहितात, 'सोनिया गांधी यांचे लग्न १९६८ मध्ये झाले. सोनिया गांधी या पंतप्रधानांच्या घरात रहात होत्या. त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नसताना १५ वर्षे मतदान करत होत्या. संजय गांधींचा १९८० मध्ये मृत्यू झाला त्यानंतर सोनिया गांधी यांनी १५ वर्षांनी १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व घेण्याचा निर्णय घेतला. इंदिरा गांधी यांच्या वारसदाराचा मृत्यू झाल्यानंतरच त्यांनी नागरिकत्व घेण्याचा का निर्णय घेतला?'
कंगना रनौतने इन्स्टाग्रामवर अनेक आरोप सोनिया गांधी यांच्यावर केले. त्या एनवीडिया प्रमुखांच्या हनी ट्रॅपचा उल्लेख करत आपल्या इन्स्टा स्टोरीवर लिहितात, 'प्रत्येक जण एनवीडिया हनी ट्रॅप बाबत बोलत आहेत. मी आणीबाणीबाबत खूप रिसर्च केला आहे. मी भारतीय राजकारण आणि गांधी फॅमिली बाबत देखील रिसर्च केला असून मी हे मान्य करते की माझ्या डोक्यातून ही गोष्ट जात नाहीये की एक गुढ विदेशी नागरिक गांधी कुटुंबात दाखल होते. त्यानंतर इंदिरा गांधी यांना मारलं जातं. संजय गांधी, राजीव गांधी सर्व राजकीय वारसदारांचा मृत्यू होतो.
कंगना पुढे लिहितात की, त्यानंतर एकच सहानभुतीचा पर्याय उरतो. ती एक विदेशी व्यक्ती म्हणजे सोनिया गांधी. लोकांना एवढे सगळे योगायोग कसे दिसून आले नाहीत. या विदेशी व्यक्तीने खुलेपणे विदेशी अजेंडा पुढे रेटला. दहशतवादावर मगरीचे अश्रू ढाळले. मात्र तरी देखील त्या २०१४ पर्यंत सरकारचे नेतृत्व करत राहिल्या.'
कंगना रनौत यांनी काही तासांनी अजून एक इन्स्टा पोस्ट टाकत संजय गांधी यांच्या निधनानंतर मनेका गांधी यांना बाहेर काढण्यात देखील सोनिया गांधींचा हात असल्याचा आरोप केला. कंगनाने राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या भेटीवर देखील आक्षेप घेतला. त्यांनी सोनिया गांधी अशाच राजीव गांधी यांना कॉफी शॉपमध्ये भेटतात आणि त्या शक्तीशाली गांधी कुटुंबात दाखल होतात हे खूप विचित्र असल्याचं वक्तव्य कंगना रनौत करतात
अर्थात अभिनेत्री असलेल्या कंगना रनौत यांनी या सर्व आरोपांबाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. मात्र भारतीय राजकारणात टीकेचा स्तर कसा आहे याचा पुरावा त्यांनी नक्कीच सादर केला.