

kangana ranaut rahul gandhi parliament jharkhand student protest bjp
पुढारी ऑनलाईन : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या मंगळवारच्या कामकाजादरम्यान एनडीए आणि काँग्रेसचे खासदार एकमेकांविरोधात सातत्याने आंदोलन करत आहेत. एनडीएच्या खासदारांकडून 'राहुल गांधी माफी मागा' अशा घोषणा दिल्या जात आहेत. संसदेत विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर होणाऱ्या चर्चेपासून राहुल गांधी पळ काढत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज १७वा दिवस आहे. संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी एनडीएच्या खासदारांनी संसद परिसरात मार्च काढत राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.
कंगना रनौत म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चेला नकार दिला आहे. यापूर्वी त्यांनी 'कॉकरोच प्रोटेस्ट'चा उल्लेख करत संसदेत विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र, सरकारने चर्चेसाठी तयारी दर्शवल्यानंतर तेच मागे हटले. त्यामुळे ते देशाची किती मोठी फसवणूक करत आहेत, हे यातून दिसून येते. त्यांनी एक दिवसही संसद चालू दिली नाही, असा आरोप कंगना यांनी केला.
यावेळी भाजपचे खासदार 'झारखंडमध्ये झालेल्या अन्यायावर राहुल गांधी उत्तर द्या' अशा घोषणा देताना दिसले. दरम्यान, भाजपच्या खासदारांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यावरही सवाल उपस्थित केले. प्रियंका गांधी झारखंडमध्ये का गेल्या नाहीत? झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर त्या गप्प का आहेत?, असे प्रश्न भाजप खासदारांनी उपस्थित केले.
दुसरीकडे, काँग्रेसचे खासदार २० जुलै रोजी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. त्यामुळे संसदेच्या परिसरात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे चित्र आहे.