

Kalashnikov IZH-Enduro electric bike:
नवी दिल्ली : जगभरात AK-47 रायफल बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेली रशियाची नामांकित कंपनी कलाश्निकोव्ह (Kalashnikov) आता इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. कंपनीने IZH-Enduro नावाची एक इलेक्ट्रिक मोटरसायकल तयार केली आहे. ही बाईक एका विशेष साइडकारसह डिझाइन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही साइडकार बसण्यासाठी नसून इतर कामांसाठी आहे. सध्या ही इलेक्ट्रिक मोटरसायकल सर्वत्र चर्चेत असून, या अनोख्या बाईकच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्या.
या मोटरसायकलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची साइडकार. सहसा साइडकारमध्ये लोक बसतात, परंतु यात ती एका 'फ्लॅटबेड' सारखी बनवण्यात आली आहे. याचा वापर सामान वाहून नेण्यासाठी किंवा गरजेनुसार विशेष कामांसाठी केला जाऊ शकतो. अवजड सामान नेण्यासाठी यात मागे एक वेगळी ट्रॉली जोडण्याची सोयही देण्यात आली आहे. ही बाईक ट्रॉली ओढू शकते.
बहुतेक इलेक्ट्रिक बाईक्समध्ये गिअर नसतात, परंतु IZH-Enduro मध्ये ४-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि क्लच देण्यात आला आहे. यामुळे खडतर रस्ते आणि चढणीवर चालक उत्तम नियंत्रण ठेऊ शकतो. ग्राहक त्यांच्या गरजेनुसार ३ kW किंवा ५ kW ची मोटार निवडू शकतात. तसेच, ज्यांना इलेक्ट्रिक मॉडेल नको आहे, त्यांच्यासाठी ४५०-सीसी पेट्रोल इंजिनचा पर्यायही उपलब्ध आहे.
ही इलेक्ट्रिक बाईक ताशी १२० किलोमीटर वेगाने धावू शकते. एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही बाईक साधारण १०० किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकते. साइडकारसह या बाईकचे एकूण वजन २२० किलोग्रॅम आहे. चालवताना सोयीचे व्हावे यासाठी सीटची उंची केवळ २८.३ इंच ठेवण्यात आली आहे.
IZH-Enduro ही एक आगळीवेगळी मोटरसायकल आहे. कंपनीच्या मते, ही बाईक पोलीस, रेस्क्यू टीम (बचाव दल) आणि साहसी प्रवासाची आवड असलेल्या लोकांसाठी उत्कृष्ट आहे. याचे इलेक्ट्रिक इंजिन अत्यंत कमी आवाज करते, ज्यामुळे गस्त घालणे आणि सुरक्षा कामांसाठी ती अत्यंत उपयुक्त ठरते.
सध्या या इलेक्ट्रिक बाईकची चाचणी सुरू आहे. कंपनीने अद्याप याची किंमत किंवा सर्वसामान्यांसाठी विक्रीची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, भविष्यात सुरक्षा यंत्रणांव्यतिरिक्त ही बाईक सर्वसामान्यांसाठीही उपलब्ध होऊ शकते.