

Sacrificial Ritual In Jharkhand: झारखंडमधील कुसुमभा गावातील एका ३५ वर्षाच्या आईला आणि तांत्रिकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर नरबळी देण्याच्या विधीवेळी किशोर वयाच्या मुलीचा गळा घोटल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे आईनेच आपल्या पोटच्या मुलीचा गळा घोटल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
हजारीबाग एसपी अंजनी अंजन आणि डीजीआय अंजनी झा यांनी संबंधित अटक झाल्यानंतर रात्री उशीरा पत्रकारांना या धक्कादायक घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणी संबंधित मुलीची आई रश्मी देवी, ५५ वर्षाच्या शांती देवी, ४० वर्षाचा तांत्रिक भीम राम यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण एकाच गावातील आहेत.
अंजन यांनी सांगितलं की रश्मी देवी या गावातील तांत्रिकाला सातत्यानं भेटत होत्या. त्या त्यांचा छोट्या मुलाच्या उपचारासाठी या तांत्रिकाला भेटत होत्या. त्याला काही शारीरिक आणि मानसिक व्याधी होत्या.' अंजन यांनी सांगितलं की, या तांत्रिकानं त्या आईला आपल्याला या मुलाला बरं करायचं असेल तर एका कौमार्य कन्येचा बळी द्यावा लागणार आहे असं सांगितलं होतं.
यानंतर पोलीस अधिकारी असलेल्या अंजन यांनी सांगितलं, २४ मार्च रोजी अष्टमीच्या रात्री संपूर्ण गाव राम नवमीची तयारी करत असताना शांती देवीच्या घरी त्या आईने आपल्या पोटच्या मुलीचा गळा घोटला अन् तिला मारून टाकलं. यात भीम रामने देखील मदत केली होती.
पोलिसांनी दावा केला की या तांत्रिकाने लाकडी काठीने मुलीच्या प्रायव्हेट पार्टला देखील इजा केली. त्यानंतर भीम रामने मुलीच्या डोक्यात काठी घालून अघोरी विधीसाठी रक्त देखील घेतलं होतं. यानंतर या तिघांनी मुलीचा मृतदेह बागेत पुरला.
अंजन यांनी सांगितलं की तपास करताना या आरोपींनी मुलीचा बलात्कार झाल्याचा दावा करत चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला. शवविच्छेदनाच्या अहवालात या दाव्याला पुष्टी मिळालेली नाही. भीम राम याच्यावर त्याच्या मेहुणीचा आणि अजून एका व्यक्तीचा खून केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.
दरम्यन, झारखंड उच्च न्यायालयानं या प्रकरणी स्वतःहून दखल घेत राज्य प्रशासनाला आणि पोलीस प्रमुखांना नोटीस जारी केली आहे. माध्यमांच्या वृत्तानंतर जस्टीस सुजीत नारायण प्रसाद आणि जस्टीस संजय प्रसाद यांनी ही कारवाई केली आहे.
यापूर्वी मुलीच्या आईने तिच्या मुलीचे अपहरण झाल्याचा दावा केला होता. मात्र २५ मार्चरोजी तिचा मृतदेह गावातील मळ्यात मिळाला होता. या खूनाच्या विरोधात विरोधीपक्ष भाजपने १२ तासांचा हजारीबाग बंदची हाक दिली होती.