

Prajwal Revanna Case
बंगळूर : कर्नाटकातील जीडीएस नेते आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला घरकाम करणाऱ्या महिलेवरील बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रेवण्णाला १० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच पीडित महिलेला ७ लाख रुपये भरपाई देण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. बंगळूर लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने शनिवारी ही शिक्षा सुनावली.
जवळपास १४ महिन्यांत या प्रकरणाचा निकाल देण्यात आला आहे. हासन जिल्ह्यातील होळेनरसीपूर येथील एका फार्महाऊसमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी प्रज्वल रेवण्णा याला ही शिक्षा सुनावली आहे.
दीड वर्षापूर्वी अनेक महिला अधिकाऱ्यांसह अनेक महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. लैंगिक अत्याचार, बलात्कार प्रकरणी प्रज्वल रेवण्णा याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. प्रज्वल हा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू तर केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा पुतण्या आहे.
त्याला या प्रकरणी शुक्रवारी दोषी ठरवण्यात आले होते. रेवण्णाला बलात्कार, लैंगिक छळ, पुरावे नष्ट करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले. रेवण्णाच्या अटकेनंतर जवळपास १४ महिन्यांनी आणि हा खटला सुरू झाल्यानंतर आठ आठवड्यांच्या आत न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी हा निकाल सुनावला. शुक्रवारी ज्यावेळी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले त्यावेळी तो न्यायालयात होता. त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आले.
२०२४ मध्ये रेवन्ना याच्या मतदारसंघात कथितरित्या अनेक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो जर्मनीला पळून गेला होता. पण निवडणुकीनंतर तो भारतात परत आला. त्याला ३१ मे रोजी बंगळूर विमानतळावर अटक करण्यात आली. या प्रकरणात एका महिलेने पोलिस तक्रार दाखल केली होती. एप्रिलमध्ये म्हैसूरजवळील एका फार्महाऊसमधून तिची सुटका करण्यात आली होती. रेवण्णाच्या कुटुंबाच्या सांगण्यावरून तिला तक्रार करण्यापासून रोखण्यासाठी तिचे अपहरण करण्यात आले होते, असा तिचा आरोप होता.
या प्रकरणी ४० सदस्यांच्या समावेश असलेल्या विशेष तपास पथकाने १,८०० पानांचा तपास अहवाल सादर केला होता. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, ३८ सुनावण्या घेण्यात आल्या. त्यात २६ साक्षीदारांची उलटतपासणी घेण्यात आली. तर १८० कागदपत्रे तपासण्यात आली.
तीन वेळा खासदार राहिलेल्या रेवन्ना विरुद्ध आणखी तीन प्रकरणांमध्ये खटला सुरू आहे.