Ethanol Blended Petrol: ‘शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरातून येणार का?’; भाजप खासदाराच्या वक्तव्याने नवा वाद

Ethanol Blended Petrol: भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाला विरोध करणाऱ्यांवर आक्रमक टीका केली.
Ethanol Blended Petrol
Ethanol Blended PetrolPudhari
Published on
Updated on

Ethanol Blended Petrol: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यावरून देशात सुरू असलेल्या चर्चेला आता राजकीय रंग मिळताना दिसत आहे. मध्य प्रदेशातील रीवा येथील भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करणाऱ्यांवर टीका केली. त्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “शुद्ध पेट्रोल कुठून येणार? तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का?” असा सवाल त्यांनी जाहीर कार्यक्रमात केला.

रीवा विमानतळावर रविवारी दोन नव्या हवाई सेवांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री, आमदार तसेच अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. याच कार्यक्रमात भाषण करताना जनार्दन मिश्रा यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचे समर्थन केले.

इथेनॉलच्या विरोधकांवर खासदारांचा हल्लाबोल

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याला काही जण विरोध करत असून, त्याऐवजी शुद्ध पेट्रोलची मागणी केली जात असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी आक्रमक भाषेत म्हटले, “ इथेनॉल चालणार नाही यावर आंदोलन होत आहे, शुद्ध पेट्रोल चालेल. शुद्ध पेट्रोल कुठून येणार? तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का? देशात शुद्ध पेट्रोल आहेच कुठे, मग ते कुठून आणणार?”

त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, राज्यातील वरिष्ठ नेते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच हे वक्तव्य करण्यात आल्याने त्याची अधिक चर्चा होत आहे. जनार्दन मिश्रा यांची वक्तव्ये यापूर्वीही चर्चेत राहिली आहेत. त्यांच्या आक्रमक आणि काही वेळा वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते अनेकदा चर्चेत आले आहेत.

Ethanol Blended Petrol
Investment planning | संपत्ती निर्मिती आणि निष्क्रिय उत्पन्नाचा ‘ब्लूप्रिंट प्लॅन’

‘भारताला मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करावी लागते’

इथेनॉल मिश्रणाच्या धोरणाचे समर्थन करताना मिश्रा यांनी भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीचाही मुद्दा उपस्थित केला. भारतात देशांतर्गत कच्च्या तेलाचे उत्पादन मर्यादित असून, मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल परदेशातून आयात करावे लागते, असा दावा त्यांनी केला.

जागतिक परिस्थितीचा संदर्भ देताना त्यांनी तेलाच्या पुरवठ्यासाठी मोठे अंतर पार करून जहाजांना भारतापर्यंत यावे लागते, असेही सांगितले. त्यामुळे परदेशी तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत उपलब्ध पर्यायांचा वापर करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

‘इथेनॉल नसेल तर पेट्रोल-डिझेल कुठून येणार?’

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या धोरणाचा बचाव करताना मिश्रा यांनी इथेनॉल उत्पादन वाढवण्याची गरज व्यक्त केली. भारतात वाहने इथेनॉल मिश्रित इंधनावर चालू शकतात, असे ते म्हणाले.

त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, जर इथेनॉलचा वापरच करायचा नसेल, तर देशाची इंधनाची गरज कशी भागवली जाणार? “इथेनॉल तयार होणार नाही तर पेट्रोल कुठून येणार? डिझेल कुठून येणार?” असा सवाल त्यांनी केला.

Ethanol Blended Petrol
Focused Funds | सुपर डुपर परतावा देणारे फोकस्ड फंड

इथेनॉल मिश्रणाची देशात चर्चा

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा मुद्दा गेल्या काही काळापासून देशात चर्चेचा विषय बनला आहे. सरकारकडून इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देण्यामागे परदेशी कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करणे, देशांतर्गत कृषी क्षेत्राला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि इंधन आयातीवरील खर्च कमी करणे ही प्रमुख कारणे सांगितली जातात.

मात्र, दुसरीकडे वाहनचालक आणि काही तज्ज्ञांकडून इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज, इंजिनची कार्यक्षमता आणि जुन्या वाहनांच्या इंधन प्रणालीवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे इथेनॉल मिश्रणाचा आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा विरुद्ध वाहनांच्या वापरातील संभाव्य अडचणी, असा वाद निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news